रोस्टन चेसच्या झुंजार शतकाने भारताची विजयाची संधी हुकली
By Admin | Updated: August 4, 2016 08:53 IST2016-08-04T03:31:57+5:302016-08-04T08:53:04+5:30
सबीना पार्क मैदानावर झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात रोस्टन चेसने झुंजार शतकी खेळी करुन भारताच्या विजयाचा घास हिरावून घेतला.

रोस्टन चेसच्या झुंजार शतकाने भारताची विजयाची संधी हुकली
ऑनलाइन लोकमत
किंगस्टन, दि. ४- सबीना पार्क मैदानावर झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात रोस्टन चेसने झुंजार शतकी खेळी करुन भारताच्या विजयाचा घास हिरावून घेतला. चौथ्या दिवशी चार बाद ४८ अशी वेस्ट इंडिजची अवस्था करणा-या भारतीय गोलंदाजांनी पाचव्यादिवशी साफ निराशा केली.
नाबाद १३७ धावांची खेळी करणारा रोस्टन चेस भारताच्या विजयाच्या मार्गात अडथळा बनला. त्यात थोडी मदत पावसाने केली. मात्र त्यामुळे रोस्टने जो झुंजार बाणा दाखवला त्याचे महत्व कमी होत नाही. भारताच्या विजयाच्या मार्गात 'दीवार' बनलेल्या या कामगिरीसाठी रोस्टला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्याला ब्लॅकवूड (६३), डाऊरीच (७४) आणि होल्डर (६४) यांनी महत्वपूर्ण साथ दिली. चेसने पाचव्या विकेटसाठी ब्लॅकवूड बरोबर ९३, सहाव्या विकेटसाठी डाऊरीच बरोबर १४४ आणि होल्डर बरोबर नाबाद १०३ धावांची भागीदारी करुन विंडिजचा पराभव टाळला. भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले.
खरतर भारत सहज हा सामना जिंकेल अशा स्थितीत होता. भारताला मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याची संधी होती. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १९६ धावात रोखल्यानंतर भारताने ३०४ धावांची आघाडी घेतली होती. पण भारतीय गोलंदाजांनी निराशा केली.
चौथ्या दिवशी शामीच्य धडाक्यापुढे यजमानांनी पहिल्या सत्रात १५.५ षटकांतच चार बळी गमावल्याने सलग दुसऱ्या सामन्यात त्यांच्यावर डावाच्या पराभवाचे संकट ओढवले होते. ईशांत शर्मा (१/१९) आणि अमित मिश्रा (१/२१) यांनीही अचूक मारा करताना विंडीजला दबावाखाली ठेवले.
पहिल्या डावात यजमानांनी १९६ धावा केल्यानंतर भारताने ९ बाद ५०० धावांवर पहिला डाव घोषित करून सामन्यात वर्चस्व मिळवले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी अखेरचे सत्र पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशीही पावसामुळे एक तास उशिराने खेळ सुरू झाला. सलामीवीर राजेंद्र चंद्रिका (१) तिसऱ्याच षटकात ईशांतचा शिकार ठरल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास खेळ थांबल्यानंतर ब्रेथवेट आणि ब्रावो यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी शमीने आखूड टप्प्याच्या चेंडूने ब्रावोला अडचणीत आणले.
१३व्या षटकात कर्णधार कोहलीने अमित मिश्राला गोलंदाजीला पाचारण केले. त्याने ब्रेथवेटचा बळी घेत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. यानंतर शमीने धोकादायक मार्लोन सॅम्युअल्स आणि ब्रावो यांना माघारी धाडून भारताचे वर्चस्व निर्माण केले होते.