रॉजर फेडररची हॅट्ट्रिक

By Admin | Updated: November 21, 2015 04:13 IST2015-11-21T04:13:33+5:302015-11-21T04:13:33+5:30

एक लढत बाकी असताच सेमीफायनलमधील स्थान निश्चित करणारा अनुभवी रॉजर फेडरर जपानच्या केई निशिकोरी याचे आव्हान उद्ध्वस्त करून वर्षाच्या अखेरच्या एटीपी वर्ल्ड टूर

Roger Federer's hat-trick | रॉजर फेडररची हॅट्ट्रिक

रॉजर फेडररची हॅट्ट्रिक

लंडन : एक लढत बाकी असताच सेमीफायनलमधील स्थान निश्चित करणारा अनुभवी रॉजर फेडरर जपानच्या केई निशिकोरी याचे आव्हान उद्ध्वस्त करून वर्षाच्या अखेरच्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समधील आपल्या ग्रुपमध्ये अपराजित ठरला, तर अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच यानेदेखील अंतिम चारमधील आपले स्थान पक्के केले.
जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित स्वीत्झर्लंडच्या फेडररने जपानी खेळाडूचे ७-५, ४-६, ६-४ अशा तीन सेटमधील आव्हान मोडीत काढताना त्याच्या गटातील अखेरच्या लढतीतही विजय मिळवला. तथापि, दुसऱ्या सेटमध्ये ४-१ अशा आघाडीनंतर स्वीस खेळाडूविरुद्ध निशिकोरी याने सलग पाच गेम जिंकताना ही लढत निर्णायक सेटपर्यंत खेचली. सहा वेळेसचा चॅम्पियन फेडररने त्याचा अनुभव पणास लावताना तिसरा सेट ६-४ ने जिंकला आणि सामनाही आपल्या नावावर केला.
फेडररने या विजयाबरोबरच आपल्या स्टान स्मिथ ग्रुपमध्ये १00 टक्के रेकॉर्ड कायम ठेवला. जगातील अव्वल आठ खेळाडूंत होणाऱ्या वर्ल्ड टूर फायनल्समध्ये १४ व्यांदा खेळणाऱ्या स्वीस खेळाडूने नवव्यांदा आपला अपराजित राहण्याचा विक्रम केला. ३४ वर्षीय फेडररने त्याचे तिन्ही राऊंड रॉबिन सामने जिंकले आहेत.
मंगळवारी जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या जोकोविचला पराभूत करीत फेडररने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला होता; परंतु चौथ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी खेळणाऱ्या जोकोविचनेदेखील निराश न करता झेक प्रजासत्ताकच्या टामस बेर्डिच याचा ६-३, ७-५ असा सलग सेट्समध्ये पराभव करताना फेडररच्या पाठोपाठ उपांत्य फेरी गाठली. स्टान स्मिथ ग्रुपमध्ये फेडरर तीन सामन्यातील तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थानी आहे, तर जोकोविच चार गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Roger Federer's hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.