रितू राणीचा हॉकी इंडियावर ‘हल्लाबोल’
By Admin | Updated: July 16, 2016 21:28 IST2016-07-16T21:28:14+5:302016-07-16T21:28:14+5:30
रिओ ऑॅलिम्पिकला जाणा-या भारतीय महिला हॉकी संघात समावेश न केल्याबद्दल माजी कर्णधार रितू राणी हिने हॉकी इंडियावर चांगलेच तोंडसुख घेतले

रितू राणीचा हॉकी इंडियावर ‘हल्लाबोल’
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 16 - रिओ ऑॅलिम्पिकला जाणा-या भारतीय महिला हॉकी संघात समावेश न केल्याबद्दल माजी कर्णधार रितू राणी हिने हॉकी इंडियावर चांगलेच तोंडसुख घेतले. खराब कामगिरी आणि असभ्य वागणुकीचा स्वत:वरील आरोपही नाराज रितूने फेटाळला.
एका वाहिनीला दिलेला मुलाखतीत ती म्हणाली,‘फिटनेस आणि असभ्य वागणूक हे दोन्ही मुद्दे गौण आहेत. संघाबाहेर केल्याचे कुठलेही ठोस कारण अद्याप देण्यात आले नाही. मी शिबिर सोडल्याचा आरोप करण्यात आला. शिबिरातील ब्रेकदरम्यान माझे साक्षगंध झाले. मी त्यासाठी परत गेले पण माझ्यावर शिबीर सोडल्याचा ठपका ठेवण्यात आला. पुरुष हॉकी संघाचा खेळाडू सरदारसिंग हा देखील खासगी आयुष्यात संकटाचा सामना करीत आहे. त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले पण तो संघात कायम आहे. मला मात्र सापत्न वागणूक देण्यात आल्याचे रितूने जोर देत सांगितले.
रितू पुढे म्हणाली,‘इतक्या वर्षांपासूनची हॉकीतील माझी मेहनत झटक्यात नाहीशी करण्यात आली. संघाची कर्णधार आणि मधल्या फळीतील जबाबदार खेळाडू या नात्याने हॉकीला मी बरेच काही दिले. या खेळाने देखील मला नाव दिले. पण हॉकी इंडियाने माझी कारकीर्द मातीमोल करण्याचे ठरविलेले दिसते.’