मुंबई : सारा जामसुतकर या उदयोन्मुख टेबल टेनिसपटूने थ्री स्टार टेबल टेनिस स्पर्धेत आपला दबदबा राखताना तीन गटांमध्ये विजेतेपद पटकावले. साराने १५ वर्षांखालील, १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील या तीन वयोगटांमध्ये विजेतेपद पटकावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या (एमसीडीटीटीए) मान्यतेने इंडियन जिमखानाच्या यजमानपदाखाली झालेल्या या स्पर्धेत स्पिनआर्ट अकॅडमीच्या साराने १५ वर्षांखालील अंतिम सामन्यात वेदांतिका रस्तोगी हिचे आव्हान ११-३, ११-४, ११-५ असे सहजपणे परतवले. साराच्या आक्रमकतेपुढे वेदांतिकाला पुनरागमनाची संधी मिळाली नाही.
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
साराने पुढे आपला हाच धडाका कायम राखताना १७ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात अर्पिता बोराडेचा ११-२, ११-९, ११-६ असा धुव्वा उडवला. यानंतर १९ वर्षांखलील गटातही साराने आपला हा दबदबा कायम राखताना अर्पितालाच ११-५, ७-११, ११-८, ११-६ असे पराभूत केले. पहिला गेम गमावल्यानंतर दुसरा गेम जिंकून अर्पिताने १-१ अशी बरोबरी साधली. परंतु, यानंतर साराने सलग दोन गेम जिंकून स्पर्धेतील आपले तिसरे विजेतेपद निश्चित केले.