रिओ पॅरालिम्पिक - भारताला आणखी एक सुवर्णपदक
By Admin | Updated: September 14, 2016 09:36 IST2016-09-14T07:43:32+5:302016-09-14T09:36:15+5:30
रिओमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या देवेंद्र झाझरियाने एफ ४६ प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

रिओ पॅरालिम्पिक - भारताला आणखी एक सुवर्णपदक
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १४ - रिओमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या देवेंद्र झाझरियाने एफ ४६ प्रकारात सुवर्णपदक पटकावले. २००४ अॅथेन्स पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावताना देवेंद्रने रचलेला विश्वविक्रम स्वत:च मोडीत काढला.
त्यावेळी देवेंद्रने ६२.१५ मीटर अंतरावर भालाफेक करुन सुवर्णपदक मिळवले होते. रिओमध्ये देवेंद्रने आपल्याच कामगिरीत सुधारणा केली. त्याने ६३.९७ मीटर अंतरावर भालाफेक करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली. ३६ वर्षीय देवेंद्र जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे दुसरे सुवर्ण आणि एकूण चौथे पदक आहे.
सोमवारी दीपा मलिकने गोळाफेकमध्ये रौप्यपदकाला गवसणी घातली होती. पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी ती भारताची पहिली महिला क्रीडापटू आहे. तामिळनाडूच्या मरियप्पन थंगवेलू याने पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी उंचउडी प्रकारात सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात तिसऱ्या स्थानावर राहिलेला उत्तर प्रदेशचा २१ वर्षांचा वरुणसिंग भाटी कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
भालाफेकीच्या प्रकारात देवेंद्र सोबत रिंकू हुड्डा आणि सुंदर सिंह गुरजर गे भारतीय खेळाडूही होते. रिंकूने ५४.३९ मीटर अंतरावर भालाफेक केली त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. राजस्थानमध्ये जन्मलेला देवेंद्रला डावा हात नाहीय. त्याला २००४ साली अर्जुन पुरस्कार आणि २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय पॅरालिम्पियन खेळाडू आहे.