..तर वर्ल्डकप फायनलचा निकाल सुपर ओव्हरद्वारे
By Admin | Updated: January 29, 2015 13:47 IST2015-01-29T13:46:59+5:302015-01-29T13:47:07+5:30
क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गुरुवारी घेतला.

..तर वर्ल्डकप फायनलचा निकाल सुपर ओव्हरद्वारे
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. २९ - क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गुरुवारी घेतला. तसेच सध्या सुरु असलेल्या क्रिकेट मालिकांमध्ये षटकांची गती धीमी राखल्याबद्दल विश्वचषकातील सामन्यांमध्ये निलंबित करता येणार नाही अशी दिलासादायक घोषणाही आयसीसीने केली आहे.
गुरुवारी दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०११ च्या विश्वचषकात आयसीसीने अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेतला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत आयसीसीने २०१५ च्या विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर न खेळविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दोन्ही संघांना विभागून विश्वविजेतेपद दिले जाणार होते. मात्र आज झालेल्या बैठकीत आयसीसीने आधीचा निर्णय रद्द करुन आवश्यकता असल्यास सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास क्रिकेट प्रेमींना सुपर ओव्हरचा थरार अनुभवता येणार आहे.
सध्या सुरु असलेल्या क्रिकेट मालिकांमध्ये षटकांची गती कमी राखल्यास कर्णधाराचे निलंबन होऊ शकते. मात्र या कारवाईची अंमलबजावणी विश्वचषकात न करता विश्वचषकानंतर होणा-या स्पर्धांमध्ये केली जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत विश्वचषक स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी झाले आहेत.
.................
२०१६ मधील टी -२० विश्वचषक भारतात
२०१६ मधील टी - २० विश्वचषक भारतात रंगणार असून गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तर २०१९ मध्ये होणारे विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे.