पराभवासाठी खेळपट्टी जबाबदार - धोनी
By Admin | Updated: October 19, 2015 12:03 IST2015-10-19T11:59:40+5:302015-10-19T12:03:13+5:30
कर्णधार महेंद्रसिंह धोनीने तिस-या एकदिवसीय सामन्यातील पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडले आहे. खेळपट्टी संथ होत गेल्याने आम्हाला मोठे फटके मारता येत नव्हते असे धोनीने म्हटले आहे.
पराभवासाठी खेळपट्टी जबाबदार - धोनी
ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. १९ - कर्णधार महेंद्रसिंह धोनीने तिस-या एकदिवसीय सामन्यातील पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडले आहे. खेळपट्टी संथ होत गेल्याने आम्हाला मोठे फटके मारता येत नव्हते असे धोनीने म्हटले आहे.
राजकोट येथील तिस-या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा १८ धावांनी पराभव करत मालिकेत २ - १ ने आघाडी घेतली आहे. राजकोट वन डेत आफ्रिकेचे २७१ धावांचे लक्ष्यही भारताला गाठता न आल्याने संघावर टीका होत आहे. मात्र कर्णधार महेंद्रसिंह धोनीने यासाठी थेट खेळपट्टीलाच जबाबदार धरले आङे. २७१ धावांचे लक्ष्य फार मोठे नव्हते. खेळपट्टी अशीच राहिली तर हे लक्ष्य सहज गाठू शकू असे आम्हाला वाटत होते. पण प्रत्यक्षात खेळपट्टी संथ होत गेली, चेंडू बॅटवर येत नव्हता आणि फलंदाजांना मोठे शॉट मारणे कठीण होत गेले असे धोनीने सांगितले. मी आणि विराट कोहली मैदानात स्थिरावलो होतो, पण आऊटफिल्डही मोठी असल्याने आम्हालाही मोठे फटके मारताना अडचणी येत होत्या असे त्याने नमूद केले.
मालिकेत अपयशी ठरलेल्या सुरेश रैनाचीही धोनीने पाठराखण केली. रैनाने फलंदाजीला आल्यावर काही वेळ खेळपट्टीवर जम बसवावा आणि मगच मोठे फटके मारावेत असा सल्लाही त्याने दिला. भारताला सातव्या क्रमांकासाठी मोठे शॉट्स मारु शकेल अशा चांगल्या फलंदाजांची अजूनही गरज आहे अशी कबुलीही त्याने दिली.