पाकशी संबंध तोडले

By Admin | Updated: December 15, 2014 00:03 IST2014-12-15T00:03:55+5:302014-12-15T00:03:55+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंनी चाहत्यांसोबत गैरवर्तन करताना असभ्य इशारे केले.

The relationship with Pakistan broke | पाकशी संबंध तोडले

पाकशी संबंध तोडले

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंनी चाहत्यांसोबत गैरवर्तन करताना असभ्य इशारे केले. त्यामुळे पुढील वर्षी मार्च महिन्यात परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध आयोजित द्विपक्षीय मालिकेत हॉकी इंडियाने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताविरुद्ध काल, शनिवारी खेळल्या गेलेल्या चुरशीच्या लढतीत ४-३ ने विजय मिळविणाऱ्या पाकिस्तान संघातील खेळाडूंच्या असभ्य वर्तनामुळे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा नाराज झाले आहेत. पाकिस्तानी खेळाडूंचे वर्तन अयोग्य असून, ते स्वीकारार्ह नसल्याचे बत्रा म्हणाले.
बत्रा म्हणाले, ‘पाकिस्तानी महासंघाने बिनशर्त माफी मागायला हवी. आम्ही २०१५ च्या मार्च महिन्यात एका द्विपक्षीय मालिकेच्या आयोजनाची योजना आखली होती; पण आता ते शक्य नाही. खेळाडूंच्या वर्तनाबाबत ‘एएफआयएच’ने घेतलेल्या भूमिकेचे आश्चर्य वाटते. पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय प्रेक्षकांनी डिवचले असेल, अशी प्रतिक्रिया ‘एएफआयएच’ने व्यक्त केली आहे. मी जर तुमच्याविरुद्ध असभ्य भाषेचा वापर केला तर तुम्ही माझ्याविरुद्ध कारवाई करू शकता. खेळाडूंविरुद्ध कारवाई करण्याची आमची मागणी आहे.’
पाकिस्तानने भारताविरुद्ध उपांत्य लढतीत चमकदार कामगिरी करीत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला; पण कलिंगा स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळाडूंची आनंद साजरा करण्याची पद्धत चाहते व मीडियाला आवडली नाही. विजयानंतर पाकिस्तान संघातील सर्व खेळाडूंनी आपले टी-शर्ट काढून चाहत्यांकडे असभ्य इशारे केले. खेळामध्ये अशाप्रकारचे वर्तन खपवून घेतले जाऊ शकत नाही.
बत्रा यांनी याबाबत कठोर भूमिका घेताना म्हटले आहे की, ‘शनिवारी रात्री पाकिस्तानी खेळाडूंच्या वर्तनातून त्यांच्या संस्कृतीची झलक दिसली. पाकिस्तानच्या प्रशिक्षकाची पत्रकार परिषद सोडून देण्याची कृती बालिशपणाची होती. ’
एएफआयएचने (आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ) सामन्यानंतर दिलेल्या अधिकृत प्रतिक्रियेमध्ये स्पष्ट
केले की, ‘भारताविरुद्ध उपांत्य फेरीच्या लढतीत विजय मिळविल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्या जल्लोषाचे स्पर्धा संचालक म्हणून आम्ही चौकशी केली. आम्ही याबाबत पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक शहनाज शेख यांच्यासोबत चर्चा केली. पाकिस्तानी खेळाडूंचे वर्तन एएफआयएचच्या पातळीवर स्वीकार करण्यायोग्य नसल्याचे त्यांनी कबूल केले.’ (वृत्तसंस्था)

> पाकिस्तानी संघातील अनेक खेळाडूंचे वर्तन चिंताजनक होते. कुणा एका व्यक्तीला यासाठी दोषी धरता येणार नाही. कुणाच्या प्रतिक्रियेच्या विरोधात खेळाडूंची ही कृती असू शकते. शहनाज शेख यांनी माफी मागितली असून, असे कृत्य पुन्हा घडणार नाही, याची खात्री दिली. त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याची गरज नाही, असा निर्णय घेण्यात आला.
- व्हिएर्ट डोयर,
स्पर्धा संचालक

Web Title: The relationship with Pakistan broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.