रिअल माद्रीदचा झंझावात
By Admin | Updated: October 24, 2014 03:50 IST2014-10-24T03:50:09+5:302014-10-24T03:50:09+5:30
रोनाल्डाने पहिला गोल नोंदविल्यानंतर करिम बेंजेमाने दोन गोल करून या विजयात मोलाचा वाटा उचलला.

रिअल माद्रीदचा झंझावात
लिव्हरपूल : क्रिस्टीआनो रोनाल्डोच्या प्रेरणादायी गोलने रिअल माद्रिदने गुरुवारी चॅम्पियन्स लीगच्या ‘ब’ गटातील लढतीत यजमान लिव्हरपूलचा ३-० असा धुव्वा उडविला आणि स्पर्धेतील सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाकडे आगेकूच केली. रोनाल्डाने पहिला गोल नोंदविल्यानंतर करिम बेंजेमाने दोन गोल करून या विजयात मोलाचा वाटा उचलला.
रोनाल्डोने आपली मॅजिकल कामगिरी कायम राखत या लढतीत वर्चस्व गाजवले. २३व्या मिनिटाला रोनाल्डो आणि बेंजेमा यांच्यातील अचूक ताळमेळ पाहायला मिळाला. रोनाल्डोकडून बेंजेमा आणि पुन्हा रोनाल्डो असा चेंडू पास होत पुढे जेम्स रॉड्रिग्जकडे गेला. तोपर्यंत रोनाल्डो गोलपोस्टजवळ पोहोचला होता आणि रॉड्रिग्जने चेंडू रोनाल्डोला पास करून त्याला पहिला गोल करण्याची संधी दिली. फॉर्मात असलेल्या रोनाल्डोने गोल करून माद्रिदला आघाडी मिळवून दिली. त्यात ३०व्या मिनिटाला बेंजेमाने भर टाकली. राईट टू लेफ्ट अशी रणनीती आखत रोनाल्डो, एस्को, टोनी क्रुस आणि बेंजेमा यांनी हा गोल केला आणि माद्रिदची आघाडी २-० अशी मजबूत केली. पुन्हा एकदा बेंजेमाने ४१व्या मिनिटाला गोल करून संघाला मध्यांतरापर्यंत ३-० असे फ्रंटसिटवर बसवले. क्रुस याने दिलेला कॉर्नर पेपेने बेंजेमाकडे पास केला आणि बेंजेमाने तो गोलमध्ये रूपांतरित केला. मध्यांतरानंतर लिव्हरपूलकडून फार चुरस पाहायला मिळाली नाही. त्यांनी पराभव पत्करलाच होता. या विजयामुळे माद्रिदने सहा गुणांसह गटात अव्वल स्थान पटकावले आहे .
या विजयानंतर माद्रिदचे प्रशिक्षक कार्लो अँसेलोट्टी म्हणाले, आमच्यासाठी हा विजय अतिशय महत्त्वाचा आहे. संघाने अप्रतिम खेळ केला. आम्ही अशा संघाविरुद्ध खेळत होतो की, ते कधीही आमच्यासमोर अडचण निर्माण करू शकले असते, परंतु आम्ही त्यांना तसे करण्यास रोखले. संघाची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. या विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीलाच जाते.