रिअल माद्रिद चॅम्पियन
By Admin | Updated: June 5, 2017 03:54 IST2017-06-05T03:54:55+5:302017-06-05T03:54:55+5:30
क्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग चषक पटकाविला

रिअल माद्रिद चॅम्पियन
कार्डीफ : क्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग चषक पटकाविला. अंतिम सामन्यात त्यांनी युवेंटसचा ४-१ ने पराभव केला. या विजयाबरोबरच त्यांनी युरोपियन फुटबॉल क्लब लीगच्या चषकावर सलग दुसऱ्या वर्षी नाव कोरले. अशी कामगिरी करणारा तो एकमेव संघ ठरला.
पोर्तुगालचा सुपरस्टार रोनाल्डो याने रिअल माद्रिद संघाला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली होती. मात्र, मारिया मॅडजुकीचच्या गोलमुळे सामना बरोबरीवर आला. त्यानंतर कासेमीरो, रोनाल्डो आणि मार्की असेनसियो यांनी गोल नोंदवून रिअल माद्रिदला चार वर्षांत तिसऱ्यांदा चषक जिंकून दिला. चॅम्पियन्स लीगचे हे त्यांचे १२वे विजेतेपद आहे. चॅम्पियन्स लीगच्या चार वेळा विजेत्या संघाच्या रोनाल्डोने या स्पर्धेतील सलग पाचव्या सत्रात सर्वाधिक गोल नोंदवण्याचा विक्रम नावे केला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचा प्रतिस्पर्धी लियोनेल मेस्सीच्या ‘पाच बॅलोन डिआॅर’शी बरोबरीची शक्यता वाढली आहे. दरम्यान, गेल्या १७ महिन्यांपासून संघाचे मुख्य प्रशिक्षक जिनेदिन जिदान हे पहिले विदेशी प्रशिक्षक बनले ज्यांनी दोन वेळा चषक जिंकून दिला. याआधी, अरिगो साचीने १९८९ आणि १९९० मध्ये मिलानला हा गौरव मिळवून दिला होता.
>निकालानंतर चेंगराचेंगरीत ४०० जखमी
इटलीतील तुरीन शहरात मोठ्या स्क्रिनवर चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना पाहण्यासाठी युवेंटसच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी धोक्याच्या सूचना अलार्म वाजवून चुकीच्या पद्धतीने देण्यात आली. त्यामुळे उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ४०० जण जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ही घटना शनिवारी पिझ्झा सॅन कार्लाे चौकात घडली. या घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले. सुरक्षारक्षकांनी परिस्थिती आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आपल्या क्लब आणि देशासाठी असे एकूण ६०० गुण नोंदवणाऱ्या रोनाल्डोने म्हटले की, सलग दोन वर्षे चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवणारा संघ बनल्यानंतर खूप आंनद होत आहे. मी सत्राचा शानदार समारोप केला आहे. हा सुद्धा एक विक्रमच आहे. दोन वेळा जेतेपद मिळवण्याची किमया ही सांघिक प्रदर्शनामुळे करता आली.