आॅलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शक सज्ज

By Admin | Updated: August 6, 2016 03:32 IST2016-08-06T03:32:38+5:302016-08-06T03:32:38+5:30

ब्राझीलच्या रिओ दी जानिरो येथे ३१व्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शकांनी कंबर कसली आहे.

Ready to show up to the colorful of the Olympic inauguration ceremony | आॅलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शक सज्ज

आॅलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शक सज्ज


रिओ : ब्राझीलच्या रिओ दी जानिरो येथे ३१व्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शकांनी कंबर कसली आहे. देशातील विद्यमान राजकीय संकट आणि आर्थिक मंदीच्या विरोधात आपला आवाज बुलंद करून जगाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याची निदर्शकांची योजना आहे.
हॉटेल कोपा कबानाच्या बाहेर सकाळी आणि पुन्हा माराकाना स्टेडियमबाहेर विरोध दर्शविण्याची निदर्शकांची योजना आहे. माराकाना स्टेडियममध्ये आॅलिम्पिक मशालने ज्योत प्रज्वलित करताच स्पर्धेची सुरुवात होणार आहे.
त्याआधी निदर्शकांनी आॅलिम्पिक मशाल रिलेदरम्यानही विविध ठिकाणी विरोध दर्शविला. त्यामुळे दंगलविरोधी पोलिसांसोबत त्यांची झटापटदेखील झाली. याशिवाय, निदर्शकांनी उद्घाटन सोहळ्यादरम्यान कार्यवाहक राष्ट्रपती मायकेल तेमेर यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्याचीदेखील धमकी दिली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या चोख बंदोबस्तामुळे निदर्शकांची संख्या काही हजारांपर्यंतच असेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे; परंतु निदर्शकांच्या विरोधामुळे खेळातील या महाकुंभाच्या आयोजनाचा बेरंग होण्याची शक्यता आहे.
ब्राझीलचे एक स्थानिक पत्रकार आणि निदर्शनकारी मॅन्युएला त्रिनिदादे यांनी तर आॅलिम्पिक खेळ ही देशासाठी मोठी आपत्ती असल्याचे म्हटले आहे. आम्ही आमचा राग तेमेर यांच्याविरुद्ध दाखविणार आहोत. ते एका जखमेप्रमाणे आहेत. जनतेने अशा सरकारला स्वीकारू नये अशी आमची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ब्राझीलच्या प्रसिद्धिमाध्यमांनुसार अधिकारी राष्ट्रपती तेमेर यांचे उद्घाटन सोहळ्यातील भाषण संक्षिप्त ठेवण्याची योजना बनवीत आहेत. ज्यामुळे लोकांना त्यांचा विरोध करण्याची जास्त संधी मिळणार नाही. त्याचबरोबर, निदर्शकांचा आवाज जोरदार संगीतात दबून जाईल, असे आयोजकांना वाटते. तेमेर यांनीदेखील निदर्शकांच्या हुटिंगसाठी आपण तयार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे २००९ साली ब्राझीलने आॅलिम्पिकचे यजमानपद मिळवले होते. मात्र त्यावेळी देशाची आर्थिक स्थिती मजबूत होती. (वृत्तसंस्था)
>दक्षिण अमेरिकेत होणाऱ्या पहिल्या आॅलिम्पिक खेळाचे उद्घाटन माराकाना स्टेडियममध्ये होणार असून, तेथे ५० हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक, ११ हजार खेळाडूंसह विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित असतील. या रंगारंग सोहळ्याकडे जगभरातील क्रीडारसिकांचे लक्ष असेल; दुसरीकडे ब्राझीलमध्ये असंतोषी गटासाठीदेखील आपला विरोध मोठ्या व्यासपीठावर व्यापक प्रमाणात दर्शविण्याची एक मोठी संधी आहे.

Web Title: Ready to show up to the colorful of the Olympic inauguration ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.