आरसीबीपदाचा राजीनामा नाही देणार : पटेल
By Admin | Updated: November 16, 2015 02:44 IST2015-11-16T02:44:46+5:302015-11-16T02:44:46+5:30
नुकताच मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’ नियम लागू करण्याचा निर्णय घेतला.

आरसीबीपदाचा राजीनामा नाही देणार : पटेल
बंगळुरू : नुकताच मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’ नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. यानुसार बीसीसीआयमध्ये कार्यरत असलेला अधिकारी किंवा त्याचा जवळचा नातेवाईक आयपीएल फ्रँचाईजीद्वारे आर्थिक लाभ घेणारा नसावा. मात्र अजूनही काही अधिकारी आयपीएलमध्ये कार्यरत असल्याचे समोर येत आहे. यामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत ते ब्रिजेश पटेल. पटेल कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे (केएससीए) सचिव असून आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) फ्रँचाईजीचे क्रिकेट संचालनप्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत.
भारताचे माजी लेगस्पिनर नरेंद्र हिरवाणी यांनी नुकताच आपला मुलगा मध्य प्रदेश संघाकडून देशांतर्गत स्पर्धेत खेळत असल्याने मध्य प्रदेशच्या वरिष्ठ निवड समितीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र सध्या पटेल यांच्याकडून अशी कोणतीही हालचाल दिसत नाही. आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेपासूनच पटेल आरसीबीच्या संचालन मंडळात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे आरसीबीच्या संकेतस्थळावर अजूनही पटेल यांच्या नावापुढे क्रिकेट संचालनप्रमुख असे पद दिसून येते.
दरम्यान, याबाबतीत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की पटेल यांचे म्हणणे आहे, की त्यांचे केएससीएमधील पद हे मानद आहे. (वृत्तसंस्था)