जेएसडब्ल्यू करणार आरसीबी संघाची खरेदी
By Admin | Updated: July 3, 2015 04:22 IST2015-07-03T04:22:43+5:302015-07-03T04:22:43+5:30
आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाचे मालकी हक्क जेएसडब्ल्यू खरेदी करणार आहे. या स्टील समूहाचे चेअरमन सज्जन जिंदाल यांनी या वृत्तास दुजोरा दिला

जेएसडब्ल्यू करणार आरसीबी संघाची खरेदी
अहमदाबाद : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाचे मालकी हक्क जेएसडब्ल्यू खरेदी करणार आहे. या स्टील समूहाचे चेअरमन सज्जन जिंदाल यांनी या वृत्तास दुजोरा दिला पण त्यांनी संघाचे नाव घेतले नाही. पण हा विजय मल्ल्या यांचा आरसीबी संघ असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
जिंदल म्हणाले, ‘क्रिकेट हा देशातील नंबर एकचा खेळ असल्याने संघ खरेदी करीत आहोत. पण कोणता संघ खरेदी करू यावर भाष्य करणार नाही. पैसा आमच्यासाठी मोठा मुद्दा नाही. क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी विश्वसनीय संघ खरेदी करायचा आहे.’ मल्ल्या यांनी २००८ साली ११ कोटी १६ लाख डॉलरची सर्वांत मोठी बोली लावून आरसीबी फ्रॅन्चायसी खरेदी केली होती.
जेएसडब्ल्यू कंपनीच्या मालकीचा आय लीगमधील बेंगळुरु एफसी फुटबॉल संघ देखील आहे. या संघाचा कर्णधार सुनील छेत्री आहे. कबड्डी आणि हॉकीसारख्या अन्य खेळांवरही आम्ही लक्ष केंद्रित करणार असल्याचे जिंदल यांनी सांगितले. याशिवाय कर्नाटकमध्ये जेएसडब्ल्यू क्रीडाग्राम बांधणार आहे. (वृत्तसंस्था)
संघ खरेदीत
डियाजियोचा अडथळा!
आरसीबी संघ जिंदल समूह २५० ते ३०० कोटी रुपयांत खरेदी करणार असून आरसीबीची मालकी युनायटेड स्प्रिंटस् लिमिटेडकडे (युएसएल) आहे. युएसएलमध्ये पेय पदार्थ तयार करणारी वैश्विक कंपनी डियाजियोची जास्त भागीदारी असल्यामुळे डियाजियो आणि माजी मालक विजय मल्ल्या यांच्या मालकीची किंगफिशर तसेच युबी ग्रुप यांच्यातील मतभेद चव्हट्यावर
आल्यामुळे करार होऊ शकला नव्हता. डियाजियोची
मनधरणी करण्यासाठी जिंदल स्वत:च्या संचालक मंडळाच्या संपर्कात आहेत.