रायुडू, बिन्नी विजयाचे शिलेदार
By Admin | Updated: July 11, 2015 01:40 IST2015-07-11T01:40:18+5:302015-07-11T01:40:18+5:30
अंबाती रायुडूचे शतक आणि स्टुअर्ट बिन्नीचा अष्टपैलू खेळ यांच्या बळावर भारताने झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ४ धावांनी

रायुडू, बिन्नी विजयाचे शिलेदार
हरारे : अंबाती रायुडूचे शतक आणि स्टुअर्ट बिन्नीचा अष्टपैलू खेळ यांच्या बळावर भारताने झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळविला. शतकवीर एल्टन चिगुंबुराचे झिम्बाब्वेला जिंकून देण्याचे प्रयत्न अपयशी ठरले.
रायुडूने प्रतिकूल परिस्थितीत नाबाद १२४ धावांची परिपक्व खेळी केली. त्यासाठी त्याने १३३ चेंडूंचा सामना केला होता. त्यात १२ चौकार, एका षटकाराचा समावेश आहे. त्याने बिन्नीच्या (७७) साथीने ६व्या गड्यासाठी १६० धावांची विक्रमी भागीदारी केली. या दोघांमुळे भारताने ६ बाद २५५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
तथापि, झुंजार शतक झळकावणाऱ्या चिगुंबुरामुळे भारताला विजय मिळवण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. चिगुंबुराने १०१ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह नाबाद १०४ धावा केल्या. त्याने ग्रॅमी क्रेमरच्या (२७) साथीने सातव्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. तरीही झिम्बाब्वेला ७ बाद २५१ पर्यंत मजल मारता आली. झिम्बाब्वेकडून सिकंदर रजाने ३७ व हॅमिल्टन मास्कादजाने ३४ धावांचे योगदान दिले.
भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला प्रारंभी जोरदार धक्के दिले; परंतु चिगुंबुराने एक बाजू लावून धरली. भुवनेश्वरने डावाच्या पाचव्या षटकात चामू चिभाभा (३) याला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर बिन्नीने बुसी सिबांडा (२0) याला तंबूत धाडले. अक्षर पटेलने हॅमिल्टन मास्कदजा (३४) आणि सीन विलियम्स (०) यांना सलग षटकात बाद करून भारताचे पारडे जड केले; परंतु सिकंदर रजाने खेळपट्टीवर येताच आक्रमक पवित्रा अवलंबला. त्याने हरभजनच्या चेंडूवर अक्षरच्या हाती झेल सोपवण्याआधी ३३ चेंडूंत ७ चौकार मारले. बिन्नीने यष्टिरक्षक मुतुंबामीला (७) जास्त वेळ खेळू दिले नाही. तथापि, त्यानंतर क्रेमरने चिगुंबुराला चांगली साथ दिली.
चिगुंबुराने चेंडू आणि धावांच्या वाढत्या अंतरानंतरही दबावात न खेळता धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने ४९व्या षटकात त्याचे दुसरे शतक पूर्ण केले. याच षटकात धवलने क्रेमरला बाद करून भारताच्या आशा पुन्हा उंचावल्या. झिम्बाब्वेला अखेरच्या षटकात १० धावांची गरज होती; परंतु भुवनेश्वरने या षटकात फक्त ५ धावा देताना भारताला तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली.
त्याआधी अंबाती रायुडू आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी त्यांच्या कारकिर्दीतील केलेल्या सर्वोत्तम खेळीच्या बळावर भारताने आघाडीची फळी स्वस्तात बाद झाल्यानंतर सावरताना झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ६ बाद २५५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती.
रायुडूने प्रतिकिूल परिस्थितीत नाबाद १२४ धावांची परिपक्व खेळी केली. यासाठी त्याने १३३ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार आणि एक षटकार मारला. त्याआधी रायुडूची सर्वोत्तम खेळी ही १२१ धावांची होती. ही खेळी त्याने गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध अहमदाबाद येथे केली होती.
त्याला बिन्नीच्या रूपाने चांगली साथ मिळाली. बिन्नीने ७६ चेंडूंत ६ चौकार, २ षटकारांसह ७७ धावा केल्या. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी १६० धावांची भागीदारी केली. ही भागीदारी भारतातर्फे नवीन विक्रम ठरला. याआधीचा विक्रम हा युवराजसिंग आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या नावावर होता. या दोघांनी झिम्बाब्वेविरुद्ध याच मैदानावर १० वर्षांपूर्वी १५८ धावांची भागीदारी केली होती.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली आणि एक वेळ त्यांचा अर्धा संघ ८७ धावांत तंबूत परतला होता. त्यानंतर रायुडू आणि बिन्नी यांनी भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. या दोघांशिवाय अजिंक्य रहाणे (३४) हाच दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकला. झिम्बाब्वेकडून चामू चिभाभाने २५ धावांत २ आणि डोनाल्ड ट्रिपानो याने ४८ धावांत २ गडी बाद केले.
भारताने सुरुवातीलाच मुरली विजयची (१) विकेट गमावली. त्याला चौथ्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज ब्रायन विटोरीने दुसऱ्या स्लीपमध्ये वुसी सिबांडाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सुरुवातीला धावा काढण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. विजयसोबत डावाची सुरुवात करणाऱ्या रहाणे आणि रायुडूने दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करून डाव सावरला.
धावफलक :
भारत : अजिंक्य रहाणे झे. मसाकद्जा गो. ट्रिपानो ३४, मुरली विजय झे. सिबांडा गो. विटोरी १, अंबाती रायुडू नाबाद १२४, मनोज तिवारी पायचीत गो. चिभाभा २, रॉबिन उथप्पा धावबाद 0, केदार जाधव झे. मुतुंबामी गो. चिभाभा ५, स्टुअर्ट बिन्नी झे. मुतुंबामी गो. ट्रिपानो ७७, अक्षर पटेल नाबाद २, अवांतर : १0, एकूण : ५0 षटकांत ६ बाद २५५. गोलंदाजी : पनयंगारा ९.२-१-५३-0, विटोरी ९-0-६३-१, ट्रिपानो ८.४-१-४८-२, चिभाभा १0-२-२५-२, क्रीमर १0-0-४७-0, विलियम्स ३-0-१७-0.
झिम्बाब्वे : सिबांडा झे. हरभजन गो. बिन्नी २0, चिभाभा झे. रहाणे गो. कुमार ३, मसकद्जा झे. तिवारी गो. पटेल ३४, चिगुंबुरा नाबाद १0४, विलियम्स त्रि. गो. पटेल 0, सिकंदर रजा झे. पटेल गो. हरभजनसिंग ३७, मुतुंबामी झे. हरभजन गो. बिन्नी ७, क्रेमर झे. बिन्नी गो. कुलकर्णी २७, ट्रिपानो नाबाद १, अवांतर : १८, एकूण : ५0 षटकांत ७ बाद २५१. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १0-१-३५-१, धवल कुलकर्णी ९-0-६0-१, स्टुअर्ट बिन्नी १0-0-५४-२, हरभजनसिंग १0-0-४६-१, अक्षर पटेल १0-१-४१-२, मनोज तिवारी १-0-६-0.
सामनावीर : अंबाती रायुडू