‘रण’भूमी
By Admin | Updated: February 13, 2015 00:31 IST2015-02-13T00:31:06+5:302015-02-13T00:31:06+5:30
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे पार पडणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेसाठी ‘रण’भूमी चांगलीच तापली आहे. १४ मैदानांवर होणा-या सामन्यांसाठी आयोजकांनीही चांगलीच कंबर कसली आहेत

‘रण’भूमी
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे पार पडणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेसाठी ‘रण’भूमी चांगलीच तापली आहे. १४ मैदानांवर होणा-या सामन्यांसाठी आयोजकांनीही चांगलीच कंबर कसली आहेत. या दोन्ही देशांची भौगोलिक परिस्थिती सारखीच असल्याने येथील खेळपट्ट्या उसळी घेणाऱ्या आहेत. विश्वचषकाच्या लढती होणाऱ्या १४ मैदानांचा घेतलेला हा आढावा...
> सिडनी क्रिकेट ग्राऊंड
फिल ह्यूज याच्या निधनामुळे या मैदानाला भावनिक महत्त्व आले आहे. त्यामुळे या मैदानावर आॅस्ट्रेलिया जी लढत खेळेल ती जिवाचे रान करूनच. जवळपास ४४ हजार प्रेक्षक क्षमतेच्या या मैदानावर आॅस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका ही लढत वगळता उपांत्यपूर्व आणि उपांत्य या मोठ्या लढती होणार आहेत. हे मैदान केवळ क्रिकेटपुरतेच मर्यादित नसून येथे फुटबॉल आणि रग्बीच्या लढतीही होतात. या मैदानावर आॅस्ट्रेलियाने ३६८ धावांचा डोंगर उभा करून श्रीलंकेची दाणादाण उडवली होती. आतापर्यंत येथे १० वेळा तीनशेहून अधिक धावा एका संघाने कुटल्या आहेत. जलद गोलंदाजांना मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनाही मधल्या षटकांत मदत मिळू शकते. एक काळ असा होता की शेन वॉर्न याने आपल्या फिरकीच्या बळावर सिडनी मैदान गाजवले होते.
> मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड
आॅस्ट्रेलियातील प्रमुख मैदान म्हणून एमसीजीची ओळख आहे. शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या या मैदानावर फुटबॉलचे सामनेही खेळविण्यात येतात. जवळपास लाखभर प्रेक्षकांची क्षमता या मैदानाला आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना मदत करणारी एमसीजीची खेळपट्टी आहे. ही खेळपट्टी जलदगती गोलंदाजांसाठी पोषक आहे. मात्र, शेन वॉर्न याने हा अपवाद ठरविला आहे. अनेकदा त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळले आहे. त्यामुळे येथे भारत तीन जलदगती गोलंदाजांसह आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकीपटूंना घेऊन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उतरेल.
अॅडलेड ओव्हल
फुटबॉल, रग्बी, तिरंदाजी, अॅथलिट्स, बेसबॉल, सायकलिंग, हॉकी आदी विविध खेळ येथे खेळले जात असल्याने ‘मल्टी’ टास्कींग अशा या मैदानाची ओळख आहे. तरीही या सर्वांत क्रिकेट हा येथील प्रसिद्ध खेळ आहे. १८७३मध्ये स्थानिक आणि संघटक यांच्यातील वाद मिटल्यानंतर हे मैदान खेळासाठी खुले करण्यात आले. ५० हून अधिक प्रेक्षकक्षमता या मैदानाची आहे. दोन्ही डावांत फलंदाज खोऱ्याने धावा चोपू शकतील अशी खेळपट्टी अॅडलेडची आहे.
> ईडन पार्क
१९२९-३० सालापासून येथे कसोटी क्रिकेट खेळले जात आहे आणि १९५५-५६ मध्ये न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी विजय येथेच साजरा केला होता. मात्र, याच मैदानावर १९५५ मध्ये इंग्लंडविरुद्ध अवघ्या २६ धावांत सर्वबाद होण्याची नामुष्की न्यूझीलंडवर ओढावली होती. कालांतराने जरी या मैदानात परिवर्तन झाले आहे. येथेही तग धरल्यास खोऱ्याने धावा बनविणे जितके सोपे आहे, तितकेच अचूक मारा केल्यास प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळणेही सहज शक्य आहे. येथे यजमान न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या लढतीची सर्वांना उत्सुकता आहे.
> ब्रिसबन क्रिकेट ग्राऊंड
४० हजार प्रेक्षकक्षमता असलेले हे मैदान गॅबा म्हणूनही ओळखले जाते. आॅस्ट्रेलियातील इतर मैदानांप्रमाणे येथील खेळपट्टीही जलदगती गोलंदाजांसाठी पोषक आहे. येथे १९६०-६१ साली आॅस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील लढत बरोबरीत सुटली होती. फलंदाजांनाही सेट होऊन आपली छाप सोडणे सहज शक्य असल्याने येथेही धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.