रामचंद्रन यांच्या अडचणीत भर
By Admin | Updated: May 27, 2015 01:33 IST2015-05-27T01:33:40+5:302015-05-27T01:33:40+5:30
भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत.

रामचंद्रन यांच्या अडचणीत भर
नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. अध्यक्ष हटाव मोहिमेला मंगळवारी भारतीय वुशू महासंघ तसेच स्रूकर आणि बिलियर्ड्स महासंघाने पाठिंबा दर्शवीत विशेष आमसभेद्वारे अविश्वास प्रस्तावाची मागणी केली.
रामचंद्रन यांच्याविरोधात ३५ पैकी १४ राज्य आॅलिम्पिक संघटना तसेच १६ राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी बंड पुकारले.याआधी बंगाल, बिहार, चंदीगड, दिल्ली, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, त्रिपुरा, आणि उत्तर प्रदेश या राज्य संघटनांनी रामचंद्रन यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी केली होती.
आयओएच्या संविधानानुसार अध्यक्ष, महासचिव, कोषाध्यक्ष आणि कार्यकारी परिषदेतील अन्य सदस्यांविरोधात अविश्वास आणायचा झाल्यास उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश बहुमताची गरज अनिवार्य आहे. आमसभेच्या बैठकीसाठी तीन चतुर्थांश सदस्यांची उपस्थिती अनिवार्य मानली जाते. आयओएच्या आमसभेत एकूण १८३ मतदार आहेत. प्रत्येक राष्ट्रीय महासंघाकडे तीन आणि प्रत्येक राज्य आॅलिम्पिक संघटनेकडे दोन मते आहेत. आयओएअंतर्गत ३९ राष्ट्रीय क्रीडा महासंघांचा समावेश असला तरी गटबाजीमुळे काहींमध्ये वाद आहे.