राकेशकुमार सर्वात महाग खेळाडू प्रो-कबड्डी लीग
By Admin | Updated: May 21, 2014 02:42 IST2014-05-21T02:42:15+5:302014-05-21T02:42:15+5:30
अस्सल मराठी मातीतील ‘कबड्डी’ या खेळासाठी मंगळवारचा दिवस सुवर्णदिन ठरला.

राकेशकुमार सर्वात महाग खेळाडू प्रो-कबड्डी लीग
मुंबई : अस्सल मराठी मातीतील ‘कबड्डी’ या खेळासाठी मंगळवारचा दिवस सुवर्णदिन ठरला. पहिल्यावहिल्या कबड्डी लीगसाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. ८ संघमालकांनी आपल्या संघासाठी खेळाडूंची खरेदी केली. या स्पर्धेमुळे जगातील सर्वोत्कृष्ट कबड्डी खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी भारतीय कबड्डी शौकिनांना मिळणार आहे. जागतिक कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदकविजेत्या राकेश कुमार याला पटणा संघाने सर्वाधिक १२ लाख ८० हजारांची बोली लावत आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले. बंगळुरू बुल्सने आशियाई सुवर्णपदक विजेत्या अजय ठाकूरला १२ लाख २० हजार इतकी किंमत देत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. आठ संघमालकांनी एकूण ४१०.९३ लाख रुपये खर्च केले आहे. भारतातील ८ राज्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह १३ देशांतून ९६ अव्वल कबड्डी खेळाडूंच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ७२ भारतीय व २४ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)