राजस्थानचे मिशन प्ले आॅफ
By Admin | Updated: May 23, 2014 02:02 IST2014-05-23T02:02:42+5:302014-05-23T02:02:42+5:30
राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे संघ शुक्रवारी होणार्या सामन्यात आमने सामने येणार आहेत़

राजस्थानचे मिशन प्ले आॅफ
मोहाली : राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे संघ शुक्रवारी होणार्या सामन्यात आमने सामने येणार आहेत़ या सामन्यात विजय मिळवून प्लेआॅफमध्ये जागा निश्चित करण्याच्या उद्देशाने राजस्थान मैदानात उतरेल, तर गुण तालिकेतील अव्वल स्थान कायम राखण्याच्या निर्धाराने पंजाब मैदानात पाऊल ठेवेल़ मुंबई इंडियन्सविरुद्धच्या गत सामन्यांत राजस्थानला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते़ आयपीएलमध्ये राजस्थानने आतापर्यंत १२ सामन्यांपैकी ७ मध्ये विजय मिळविला आहे़ त्यांच्या खात्यात १४ गुण असून गुण तालिकेत हा संघ तिसर्या स्थानावर आहे़ शुक्रवारी होणार्या लढतीत राजस्थानने पंजाबवर विजय मिळविला, तर त्यांचे प्लेआॅफमधील स्थान पक्के होईल़ मात्र, पराभूत झाल्यास इतर संघांना याचा लाभ मिळेल़ दुसरीकडे पंजाबने अंतिम चार संघांत स्थान निश्चित केले आहे़ त्यामुळे त्यांना राजस्थानकडून मात खावी लागली, तरी याचा परिणाम होणार नाही़ मात्र, पंजाबला गत लढतीत मुंबई इंडियन्सकडून हार पत्करावी लागली होती़ सध्या हा संघ गुण तालिकेत अव्वल क्रमांकावर आहे़ त्यामुळे स्पर्धेत आणखी एक पराभव पंजाबसाठी महागात पडू शकतो़ मुंबईविरुद्ध कर्णधार शेन वॉटसनने तब्बल चार बदल केले होते़ यानंतर संघातील खेळाडू केन रिचर्डसन याने संघातील बदलामुळे पराभव झाल्याचे कबूल केले होते़ त्यामुळे पंजाबविरुद्ध राजस्थान संघ आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना संधी देऊ शकतो़ मुंबईविरुद्ध राजस्थानने अनुभवी अजिंक्य रहाणेऐवजी उन्मुक्त चंदला संधी दिली होती, तर प्रवीण तांबेला संघात स्थान दिले नव्हते़ हेच बदल राजस्थानला महागात पडले होते़ राजस्थानचा संघ संतुलित असला तरी कर्णधार शेन वॉटसनला पंजाबविरुद्धच्या लढतीत संघ निवडताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे़ रॉयल्स संघात रहाणे, जेम्स फॉल्कनर, वॉटसन, ब्रॅड हॉज, संजू सॅमसन, करुण नायर, स्टीवन स्मिथ या सारखे अनुभवी फलंदाज आहेत़ आतापर्यंत रहाणे, नायर, सॅमसन यांनी आपल्या कामगिरीने प्रभावित केले आहे़ गोलंदाजीत त्यांना प्रवीण तांबे, रजत भाटिया, धवल कुलकर्णी, केवीन कुपर यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल़ दुसरीकडे पंजाब संघाने आधीच प्लेआॅफमध्ये आपले स्थान निश्चित केलेले आहे़ मात्र, प्लेआॅफच्या लढतीपूर्वी हा संघ पुन्हा विजयपथावर परतण्यास आतुर आहे़ संघातील खेळाडू ग्लेन मॅक्सवेल, वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर यांनी याआधीच्या सामन्यांत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले आहे़ (वृत्तसंस्था)