शेवटच्या क्षणाला राजस्थानने चित्र बदलले
By Admin | Updated: May 12, 2014 05:09 IST2014-05-12T04:31:52+5:302014-05-12T05:09:15+5:30
जेम्स फॉल्कनर आणि स्टिव स्मिथ यांनी शेवटच्या षटकांत केलेल्या तुफानी फलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्धच्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने पाच विकेट्स राखत शानदार विजयाची नोंद केली.

शेवटच्या क्षणाला राजस्थानने चित्र बदलले
बंगळूरू : जेम्स फॉल्कनर आणि स्टिव स्मिथ यांनी शेवटच्या षटकांत केलेल्या तुफानी फलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्धच्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने पाच विकेट्स राखत शानदार विजयाची नोंद केली. १८ वे व १९ वे षटक निर्णायक ठरले. दिंडाच्या १८ व्या षटकात फॉल्कनकर आणि स्मिथ यांनी तब्बल २३ धावा चोपल्याने सामन्याचा रंगच पालटला. त्यानंतरच्या षटकात देखील या दोन्ही फलंदाजांनी २१ धावा तडकावल्या. या दोन्ही फलंदाजांनी शेवटच्या चार षटकात तब्बल ६४ धावा फटकावल्या. फॉकनर याने १७ चेंडूत ४१ तर स्मिथ याने २१ चेंडूत ४८ धावा फटकावतांना युवराज सिंह आणि एबी डिविलीयर्स यांच्या फलंदाजीवर अक्षरश: पाणी फेरले. तत्पुर्वी बंगळूरूच्याने युवराज आणि डिविलीयर्स यांच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर १९० धावांचा डोंगर उभारला. युवराजने ३८ चेंडूत सात षटकार आणि तितकेच चौकार मारतांना ८३ धावांची खेळी केली, तर डिविलीयर्सने पाच षटकार आणि १ चौकारासह ३२ चेंडूत ५८ धावा फटकावतांना चौथ्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी केली. बंगळूरूच्या संघाने शेवटच्या दहा षटकात १३३ धावा फटकावल्या. सलामीविर आणि स्फोटक गोलंदाज ख्रिस गेल १९ धावावर माघारी परतला. विराट कोहलीला देखील नेहमी प्रमाणे खेळ दाखवता आला नाही. तो अवघ्या ४ धावावर बाद झाला. (वृत्तसंस्था)