बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात पावसाचीच बॅटींग
By Admin | Updated: June 15, 2014 20:24 IST2014-06-15T16:21:37+5:302014-06-15T20:24:52+5:30
बांग्लादेशला प्रत्यूत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या डावात पावसानेच जोरदार बॅटींग केल्याने सामना थांबवण्यात आला आहे. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत भारताने एक विकेटच्या मोबदल्यात १०० धावा केल्या होत्या.

बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात पावसाचीच बॅटींग
ऑनलाइन टीम
मीरपूर,दि. १५- भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान बांग्लादेशचा डाव २७२ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. बांग्लादेशला प्रत्यूत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या डावात पावसानेच जोरदार बॅटींग केल्याने सामना थांबवण्यात आला आहे. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत भारताने एक विकेटच्या मोबदल्यात १०० धावा केल्या होत्या.
मीरपूर येथे सहारा कपमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवारी सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करत भारताला २७३ धावांचे लक्ष्य दिले होते. भारतातर्फे रॉबिन उथप्पा आणि अजिंक्य रहाणे ही जोडी सलामीला आली. या जोडीने बांग्लादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत संघाला ९९ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र उथप्पाला ५० धावांवर बाद करण्यात बांग्लादेशच्या गोलंदाजांना यश आले. यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. मात्र तोपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावल्याने खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने १६.४ षटकात एका विकेटच्या मोबदल्यात १०० धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे ४६ तर चेतेश्वर पुजारा ० धावांवर खेळपट्टीवर होते.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करणा-या बांग्लादेशची सुरुवात निराशाजनक होती. बांग्लादेशची सलामीची जोडी अवघ्या पाच धावांवर फोडण्यात भारताला यश आले. ३५ धावांवर बांग्लादेशला दुसरा धक्का बसला. मात्र त्यानंतर अनामूल हक (४४धावा) आणि कर्णधार मुश्फिकर हक (५९ धावा) या जोडीने बांग्लादेशचा डाव सावरला. अनामूल हक बाद झाल्यावर शाकीब हसनने (५२ धावा) कर्णधाराला मोलाची साथ दिली. बांग्लादेशच्या २३५ धावांवर आठ विकेटही गेल्या होत्या. मात्र मुशरफ मोर्ताझा आणि अब्दूर रझाक या तळाच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत बांग्लादेशला सन्मानजनक धावसंख्येजवळ पोहोचवले.
भारतातर्फे उमेश यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. उमेशने नऊ षटकात ४८ धावा दिल्या. तर एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणा-या जम्मू काश्मीरच्या परवेझ रसूलच्या फिरकीनेही बांग्लादेशच्या दोन विकेट घेतल्या. रसूलने १० षटकांत ६० धावा दिल्या. फिरकी गोलंदा अमित मिश्राने १० षटकात ५५ धावा देत दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेल आणि सुरैश रैनाने प्रत्येकी एक विकेट घेतली.