रैनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही

By Admin | Updated: May 3, 2016 03:48 IST2016-05-03T03:48:42+5:302016-05-03T03:48:42+5:30

गुजरात लायन्ससाठी त्यांचे सलामीवीर महत्त्वाचे आहेत. ड्वेन स्मिथ, ब्रॅन्डन मॅक्युलम यांच्यासोबत अ‍ॅरॉन फिंचचाही विचार केला तर गेल्या रविवारपर्यंत या फलंदाजांना गोलंदाजी करणे दु:खद

Raina can not be ignored | रैनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही

रैनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही

- रवी शास्त्री लिहितो़..

गुजरात लायन्ससाठी त्यांचे सलामीवीर महत्त्वाचे आहेत. ड्वेन स्मिथ, ब्रॅन्डन मॅक्युलम यांच्यासोबत अ‍ॅरॉन फिंचचाही विचार केला तर गेल्या रविवारपर्यंत या फलंदाजांना गोलंदाजी करणे दु:खद स्वप्नाप्रमाणे भासत होते. पण, रविवारी पंजाबने गुजरातच्या सलामीवीरांना रोखण्यात यश मिळवले. आगामी लढतींमध्ये पॉवरप्लेदरम्यान या फलंदाजांविरुद्ध काही फिरकीपटूंना गोलंदाजी करताना बघण्याची संधी मिळणार असल्याचे निश्चित.
गुजरातला आता दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. त्यांच्या संघात अमित मिश्रा व इम्रान ताहिर यांच्या रूपाने दोन वेगवेगळ्या शैलीचे फिरकीपटू आहेत. दोन्ही लेगस्पिनर असले तरी त्यांच्याकडे वेगवेगळी अस्त्रे आहेत. फलंदाज या दोन्ही फिरकीपटूंना कमी लेखण्याची चूक करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत गुजरातच्या सलामीवीरांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
या दोन्ही संघांदरम्यान गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये संघर्षपूर्ण लढत अनुभवायला मिळाली. त्या वेळी दिल्लीचा कर्णधार झहीर खानने आठव्या षटकापर्यंत गोलंदाजीसाठी अमित मिश्राला पाचारण केले नाही आणि ताहिरलाही संधी दिली नाही. फलंदाजांची आक्रमकता आणि छोटे मैदान याची धास्ती झहीरने घेतली असावी किंवा कदाचित तो स्वत: जबाबदारी सांभाळण्यास इच्छुक असावा. त्याचप्रमाणे शहाबाज नदीममध्ये अन्य कुणाच्या निदर्शनास न आलेली प्रतिभा झहीरने बघितली असावी. स्मिथ व मॅक्युलम मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यात माहिर असलेले फलंदाज आहेत. स्मिथने झहीरच्या पहिल्याच षटकात चार चौकार ठोकले. मॅक्युलमने त्याच्या दुसऱ्या षटकात षटकाराने प्रत्युत्तर दिले. नदीमच्या पहिल्या दोन षटकांमध्ये षटकार ठोकले गेले. गुजरात लायन्सने केवळ चार षटकांमध्ये अर्धशतक फलकावर लावले. त्यामुळे मिश्रा व ताहिर गोलंदाजीला येण्यापूर्वीच दोन्ही फलंदाजांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. या दोन्ही फिरकीपटूंनी त्यानंतर धावगतीवर लगाम घातला. याचा अर्थ सुरेश रैनाकडे दुर्लक्ष करावे, असा होत नाही. गुजरातचा कर्णधार सध्या सर्वोत्तम फॉर्मात नाही, ही वेगळी बाब आहे. टी-२० मध्ये त्याच्यासोबत काहीतरी घडत आहे. या मोसमात तो सहा वेळा झेलचितपासून यष्टिचित आणि क्लीनबोल्डही झाला आहे. प्रत्येक वेळी त्याची बाद होण्याची पद्धत वेगळी होती. गुजरात संघासाठी त्यामुळे परिस्थिती कठीण झाली आहे. ब्राव्हो आणि जडेजा यांनाही फलंदाजीमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अलीकडच्या कामगिरीच्या आधारावर गुजरातला रोखण्याबाबत दिल्ली संघ आशावादी असेल. झहीर अ‍ॅण्ड कंपनीच्या युवा खेळाडूंनी नारायण व हॉग यांच्यासारख्या गोलंदाजांविरुद्ध शानदार खेळ केला. कुठलाच फटका अपारंपरिक नसल्याचे दिल्ली युवा संघाचे मत आहे. दिल्लीच्या आघाडीच्या सहा फलंदाजांपैकी प्रत्येकाने एकातरी लढतीत उल्लेखनीय योगदान दिले आहे. ब्रेथवेट व मॉरिस यांनीही आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. संघातील सर्वांत महागडा खेळाडू पवन नेगी याला ना फलंदाजीमध्ये ना गोलंदाजीमध्ये छाप पाडता आली आहे, ही विचार करण्यासारखी बाब आहे.(टीसीएम)

Web Title: Raina can not be ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.