पावसामुळे भारत - ऑस्ट्रेलिया वन डे रद्द

By Admin | Updated: January 26, 2015 15:12 IST2015-01-26T15:12:27+5:302015-01-26T15:12:27+5:30

तिरंगी मालिकेत सिडनी येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यावर पावसाने पाणी फेरले. मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.

Rain - India - Australia One Day Cancellation | पावसामुळे भारत - ऑस्ट्रेलिया वन डे रद्द

पावसामुळे भारत - ऑस्ट्रेलिया वन डे रद्द

ऑनलाइन लोकमत 

सिडनी, दि. २६ - तिरंगी मालिकेत सिडनी येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यावर पावसाने पाणी फेरले. मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला असून दोन्ही संघाच्या खात्यात प्रत्येकी दोन गुण जमा झाले आहेत. आता शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताची करो अथवा मरो अशी स्थिती झाली आहे. 
 
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या तिरंगी मालिका सुरु असून यात ऑस्ट्रेलियाने सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. इंग्लंडने आत्तापर्यंत फक्त भारताचा पराभव केला आहे. तर भारताने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. सोमवारी सिडनीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामन्यात होता. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे सामन्याला विलंबाने सुरुवात झाली. सामना सुरु झाल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने खेळ थांबवावा लागला. मात्र पावसाने काही वेळातच विश्रांती घेतल्याने सामना पुन्हा सुरु झाला. हा सामना ५० ऐवजी ४४ षटकांचा खेळवण्याचा निर्णयही घेतला गेला. सामना सुरु होताच सलामीवीर शिखर धवन स्वस्तात तंबूत परतला. तो अवघ्या ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर अंबाटी रायडू २३ धावांवर बाद झाला आणि भारताची अवस्था २ बाद ६२ अशी झाली. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने १६ षटकांत २ गडी गमावत ६९ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा नाबाद २८ आणि विराट कोहली नाबाद ३ धावांवर खेळत होता. तासाभरानंतरही पाऊस थांबत नसल्याने हा सामना रद्द करण्यात आला. 
शुक्रवारी भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडच्या खात्यात पाच गूण असून भारताच्या खात्यात दोन गूण आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळाल्यास भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळू शकेल. 

Web Title: Rain - India - Australia One Day Cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.