पावसामुळे आमची एकाग्रता वाढली : रोहित
By Admin | Updated: May 7, 2015 03:40 IST2015-05-07T03:40:28+5:302015-05-07T03:40:28+5:30
दिल्ली डेअरडेव्हील्स विरुध्दच्या महत्त्वाच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना झालेल्या पावसामुळे संघाला पुन्हा एकदा एकाग्रता मिळवण्यासाठी मदत झाली.

पावसामुळे आमची एकाग्रता वाढली : रोहित
मुंबई : दिल्ली डेअरडेव्हील्स विरुध्दच्या महत्त्वाच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना झालेल्या पावसामुळे संघाला पुन्हा एकदा एकाग्रता मिळवण्यासाठी मदत झाली. कारण, सुरुवातीला डकवर्थ लुईस नियम लक्षात घेऊन फलंदाजी केल्यानंतर आम्ही आमच्या योजनेत बदल केला, असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले.
रोहितने या शानदार विजयाबद्दल सांगितले की, डकवर्थ लुईस नियम लक्षात घेता सुरुवातीच्या पहिल्या पाच षटकांत आम्हाला निर्धारीत लक्ष्याच्या पुढे राहणे आवश्यक होते. आम्ही सामन्यात पुढे राहण्याच्या प्रयत्नात होतो. मी मुंबईकर असल्याने पाऊस जास्तवेळ पडणार नसल्याची जाणीव होती. मात्र, हा देखील एकप्रकारचा जुगार होता, असे सांगतानाच पुन्हा खेळण्यास सुरुवात केल्यानंतर आम्ही नेहमीचा खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि नशिबाने पावसाने यावेळी अडचण आणली नाही, असेही रोहित म्हणाला.
या विजयासह गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतल्याने आनंदित असलेल्या रोहितने या सामन्यात प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या हरभजनचे कौतुक करताना सांगितले की, भज्जीची कामगिरी अद्भूत होती. सामनावीर ठरलेल्या भज्जीने चार षटकांत केवळ ११ धावा देऊन २ बळी घेतले होते. भज्जीला चांगला टर्न मिळत होता. त्याची गोलंदाजी निर्णायक ठरली. या कामगिरीत सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे रोहित म्हणाला.(वृत्तसंस्था)