राहुल-भुवनेश्वर रणजीसाठी सज्ज

By Admin | Updated: November 12, 2016 01:43 IST2016-11-12T01:43:26+5:302016-11-12T01:43:26+5:30

सलामीवीर लोकेश राहुल आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यातील लढतीमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Rahul-Bhuvneshwar ready for Ranji | राहुल-भुवनेश्वर रणजीसाठी सज्ज

राहुल-भुवनेश्वर रणजीसाठी सज्ज

नवी दिल्ली : सलामीवीर लोकेश राहुल आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यातील लढतीमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर दुखापतग्रस्त झालेला राहुल मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकला होता. भुवनेश्वर कुमार दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. भुवनेश्वरने रणजी सामन्यात खेळणार असल्याचे स्पष्ट केले. म्हैसूरमध्ये मुंबईविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत भुवनेश्वर उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कर्नाटकचे प्रशिक्षक अरुण कुमार यांनी सांगितले की, ‘ब’ गटात राजस्थानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीपूर्वी राहुल संघासोबत जुळेल.
राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. भुवनेश्वरने कोलकाता कसोटी सामन्यात पहिल्या डावात पाच बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. राहुल व भुवनेश्वर यांनी रणजी लढतीत फिटनेस सिद्ध केला तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.

Web Title: Rahul-Bhuvneshwar ready for Ranji