राहुल आवारेला मिळाला न्याय

By Admin | Updated: April 19, 2016 03:33 IST2016-04-19T03:33:39+5:302016-04-19T03:33:39+5:30

रियो आॅलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याची डावलण्यात आलेली संधी त्याला पुन्हा मिळणार आहे.

Rahul Awala gets justice | राहुल आवारेला मिळाला न्याय

राहुल आवारेला मिळाला न्याय

पुणे : रियो आॅलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याची डावलण्यात आलेली संधी त्याला पुन्हा मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, पुण्याचे खासदार यांच्यापासून शहरातील कुस्तीपटूंनी या अन्यायाविरोधात आवाज उठविल्याने महाराष्ट्राच्या या मल्लाला आपले कौशल्य आजमविण्याची संधी मिळणार आहे.
राहुल हा ५७ किलो गटात खेळत असून, त्यासाठी तो जॉर्जिया येथे होणाऱ्या सराव शिबिरासाठी दाखल होणार होता. मात्र, आपली निवड केवळ सराव शिबिरासाठी झाली असून, मंगोलिया येथे होणाऱ्या आॅलिम्पिक पात्रता फेरीसाठी संदीप तोमर याला पाठविणार असल्याची माहिती त्याला समजली. भारतीय कुस्ती महासंघाने तोमरला व्हिसादेखील मंजूर केला असल्याची माहिती त्याला मिळाली. आपल्यावर अन्याय झाल्याचे लक्षात आल्यावर तो दिल्ली विमानतळावरूनच परतला होता.
या प्रकारानंतर राहुलचे प्रशिक्षक काका पवार, राहुल काळभोर, दत्ता गायकवाड, श्याम यादव यांसह काही मल्लांनी बारामतीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी मल्लांना दिल्लीत बोलावून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांची भेट घडवून आणली. मात्र, राहुल दिल्ली विमानतळावरून परत आला ही गोष्ट शिस्तीत बसणारी नाही, असे सांगितले.
या विषयी अधिक माहिती देताना काका पवार म्हणाले, की केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी आम्ही दिल्लीत भेटलो. त्यांनादेखील आम्ही वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी बोलणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अनिल शिरोळे यांनीदेखील क्रीडामंत्री, तसेच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा व उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्याशी संपर्क साधला. या दोघांनीदेखील याबाबत चौकशी करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी स्पोर्ट्स अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाच्या (साई) अधिकाऱ्यांना आवारेच्या मंगोलिया व तुर्किस्तान येथील सहभागाबाबतचे पत्र देण्याचे आदेश दिले. महासंघाने जर पत्र दिले नाही, तर मी माझ्या विशेष अधिकारात त्याला स्पर्धेत सहभागी होण्याचे पत्र देईल, असेही सोनोवाल यांनी सांगितले. तसेच, सोमवारी दुपारी मंत्रालयात राहुल आवारे गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांना भेटला. त्या वेळी मुख्यमंत्री व केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली. या वेळी सोनोवाल यांनी आवारेला ग्रीन सिग्नल दिल्याचे काका पवार यांनी सांगितले.
> ....तरीही राहुल उपरा
गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत राहुलने संदीप तोमरवर मात केली होती. तर अमित दहिया तिसऱ्या स्थानी राहिला होता. मात्र, आशियाई कुस्ती स्पर्धेत राहुल आवारेला संधी देण्यात अली होती. त्यात त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ही कामगिरी आॅलिम्पिकसाठी पुरेशी नसल्याचे सांगत राहुलची संधी हिरावून घेण्यात आली होती.
>> ...म्हणून राहुल प्रकरणी घातले लक्ष : मुख्यमंत्रीराहुल आवारेच्या पात्रतेबाबत मला मनात कोणतीही शंका नव्हती. तो उत्कृष्ट मल्ल असूनसुद्धा त्याच्यावर अन्याय होत असल्याचे जाणवले. यामुळेच मी यात लक्ष घातले, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला दिली. मंगोलिया येथे होणाऱ्या स्पर्धेत तो नक्कीच यश खेचून आणेल, याची मला पूर्ण खात्री आहे. मी व केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी राहुलसारख्या चांगल्या मल्लावर अन्याय होऊ नये, याबाबत चर्चा केली. सोनोवाल यांना आमच्या चर्चेत तथ्य जाणवल्याने त्यांनी राहुलला मंगोलियाला पाठविण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वी रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार व काका पवार यांच्यावरदेखील असाच अन्याय झाला होता. ते माझ्या अजूनही लक्षात आहे. पात्रता असताना महाराष्ट्राच्या मल्लांवर अन्याय होणे योग्य नाही. त्यामुळेच मी राहुल प्रकरण लावून धरले.’’

Web Title: Rahul Awala gets justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.