रहाणेची शतकाकडे वाटचाल

By Admin | Updated: December 4, 2015 01:29 IST2015-12-04T01:29:28+5:302015-12-04T01:29:28+5:30

मधल्या फळीतील विश्वसनीय फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नाबाद ८९ धावांच्या बळावर भारतीय संघाने सुरुवातीच्या पडझडीतून सावरताना द. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या

Rahane's journey towards the century | रहाणेची शतकाकडे वाटचाल

रहाणेची शतकाकडे वाटचाल

नवी दिल्ली : मधल्या फळीतील विश्वसनीय फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नाबाद ८९ धावांच्या बळावर भारतीय संघाने सुरुवातीच्या पडझडीतून सावरताना द. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत पहिल्या दिवशी ७ बाद २३१ पर्यंत मजल गाठली.
फिरोजशाह कोटलावर भारताने सलग चौथ्यांदा नाणेफेक जिंकून फलंदाजी घेत १३९ धावांत ६ गडी गमावले होते. पण रहाणेने १५५ चेंडूंचा सामना करीत ९ चौकार आणि २ षटकारांसह ८९ धावा ठोकून भारताला संकटमुक्त केले. सहा षटकेआधीच अंधूक सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला. या मालिकेत रहाणेने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. मालिकेत पहिल्या शतकापासून तो ११ धावांनी दूर आहे. कर्णधार विराट कोहलीसोबत (४४) रहाणेने चौथ्या गड्यासाठी १०२ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली; नंतर रवींद्र जडेजासोबत(२४) सातव्या गड्यासाठी ५९ धावा ठोकल्या. रविचंद्रन अश्विन(नाबाद ६)सोबतही आठव्या गड्यासाठी अजिंक्यने आतापर्यंत ६८ चेंडूत ३३ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. द. आफ्रिकेकडून आॅफ स्पिनर डेन पिएट याने ३४ षटकांत १०१ धावा देत ४ गडी बाद केले. वेगवान गोलंदाज काइल एबोट याने २३ धावांत ३ गडी टिपले.
रहाणेने कौशल्य, संयम आणि तंत्रशुद्ध खेळाच्या बळावर द. आफ्रिकेच्या वेगवान तसेच फिरकी माऱ्याला तोंड दिले. त्याने २ षटकार आॅफ स्पिनर पिएटच्या चेंडूवर मारले. ७८ धावांवर जीवदानही मिळाले. द. आफ्रिकेचा कर्णधार हशीम अमलाने स्लिपमध्ये अजिंक्यचा झेल सोडला. हा अपवाद वगळता रहाणेची खेळी निर्दोष ठरली. त्याने आपले अर्धशतक ९१ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह पूर्ण केले.
भारताने उपाहारापर्यंत १ बाद ६० आणि चहापानापर्यंत ६ बाद १३९अशी वाटचाल केली होती. दिवसाचे अखेरचे सत्र भारतासाठी उत्तम ठरले. या सत्रात ९२ धावांची भर पडली, पण एकच गडी बाद झाला. शिखर धवन, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा हे तिन्ही फलंदाज आजही अपयशी ठरले. मुरली विजयला १० धावांवर असताना जीवदान मिळाले होते . वेगवान गोलंदाज काइल एबोटच्या चेंडूवर दुसऱ्या स्लिपमध्ये डिव्हिलियर्सने त्याचा झेल टिपला. पण रिप्लेमध्ये तो नो बॉल आढळताच विजय नाबाद ठरला. पण त्याचा लाभ घेता आला नाही. विजयने दोन धावांची भर घातली तोच आॅफ स्पिनर पिएटने त्याची दांडी गुल केली. जडेजाच्या २४ धावांच्या खेळीनंतर खेळ संपेपर्यंत अश्विनने २९ चेंडू खेळून रहाणेला उत्तम साथ दिली. (वृत्तसंस्था)

बांगरने केली रोहितची पाठराखण
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात खराब फटका खेळून बाद झालेल्या रोहित शर्माची पाठराखण केली. रोहितला आणखी संधी देण्याची गरज असल्याचे बांगर यांनी म्हटले आहे.
गुरुवारी पहिल्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बांगर म्हणाले,‘देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूंमध्ये प्रतिभा असते. चूक घडली तर खेळाडूंनाही दु:ख होते. रोहित टी-२० व वन-डे सामन्यांत शतक झळकावल्यानंतर कसोटी सामन्यात खेळत आहे. रोहितला कसोटी क्रिकेटचा विशेष अनुभव नाही, हे लक्षात घ्यायला हवे.’
फलंदाजी प्रशिक्षकांनी रोहितवर विश्वास व्यक्त करताना सांगितले की,‘रोहितवर विश्वास व्यक्त करायला हवा आणि त्याला आणखी संधी मिळायला पाहिजे. भविष्यात त्याची कामगिरी नक्कीच उल्लेखनीय ठरेल, असा मला विश्वास आहे.

गांगुली, द्रविड व कुंबळेचे मानले आभार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या वीरेंद्र सेहवागने गुरुवारी फिरोजशाह कोटला मैदानावर आयोजित कार्यक्रमात माजी कर्णधार सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्यासह चॅम्पियन फलंदाज सचिन तेंडुलकर यांचे आभार मानले. सेहवागने महेंद्रसिंद धोनीचे नाव घेतले नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली सेहवाग जवळजवळ सहा वर्षे खेळला.
बीसीसीआयने भारत व दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान गुरुवारपासून प्रारंभ झालेल्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी सेहवागचा सत्कार केला. बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सेहवागला ट्रॉफी प्रदान केली. यावेळी सेहवागसोबत त्याची आई कृष्णा सेहवाग, पत्नी आरती व मुले आर्यवीर व वेदांत उपस्थित होते.
सेहवागने आपल्या निरोपाच्या भाषणामध्ये बीसीसीआय, डीडीसीए, पहिले प्रशिक्षक ए.एन. शर्मा आणि दिल्ली अंडर-१९ संघाची निवड करणारे सतीश शर्मा यांचे आभार मानले. सेहवाग म्हणाला,‘मला क्रिकेट खेळण्याची परवानगी देणाऱ्या माझ्या वडिलांचे आभार मानतो. मी माझे सर्व प्रशिक्षक विशेषत: ए.एन. शर्मा यांचे आभार मानतो. त्यांनी मला क्रिकेटपटू बनविले.

धावफलक
भारत पहिला डाव : मुरली विजय झे. अमला गो. पीएट १२, शिखर धवन पायचित गो. पीएट ३३, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. एबोट १४, विराट कोहली झे. विलास गो. पीएट ४४, अजिंक्य रहाणे खेळत आहे ८९, रोहित शर्मा झे. ताहिर गो. पीएट ०१, रिद्धिमान साहा त्रि. गो. एबोट ०१, रवींद्र जडेजा झे. एल्गर गो. एबोट २४, आर. अश्विन खेळत आहे ०६. अवांतर (७). एकूण ८४ षटकांत ७ बाद २३१. बाद क्रम : १-३०, २-६२, ३-६६, ४-१३६, ५-१३८, ६-१३९, ७-१९८. गोलंदाजी : मोर्कल १७-५-४०-०, एबोट १७-६-२३-३, पीएट ३४-५-१०१-४, ताहिर ७-१-३६-०, एल्गर ५-०-१५-०, ड्युमिनी ४-०-१२-०.

Web Title: Rahane's journey towards the century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.