रघुनंदन श्रीहरीने ग्रँडमास्टर पंत्सुलेयाला रोखले
By Admin | Updated: June 4, 2015 01:31 IST2015-06-04T01:31:49+5:302015-06-04T01:31:49+5:30
भारताच्या रघुनंदन श्रीहरी याने जबरदस्त खेळ करताना जॉर्जियाचा ग्रँड मास्टर लेवान पंत्सुलेया याला ८व्या मुंबई महापौर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले.

रघुनंदन श्रीहरीने ग्रँडमास्टर पंत्सुलेयाला रोखले
मुंबई : भारताच्या रघुनंदन श्रीहरी याने जबरदस्त खेळ करताना जॉर्जियाचा ग्रँड मास्टर लेवान पंत्सुलेया याला ८व्या मुंबई महापौर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले.
गोरेगाव स्पोटर््स क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गतविजेत्या पंत्सुलेयाचा विजय गृहीत धरला जात होता. मात्र रघुनंदनने अनपेक्षित कामगिरी करताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. इंग्लिश ओपनिंग पद्धतीने सुरुवात केल्यानंतर पंत्सुलेयाने आपला सर्व अनुभव पणास लावत प्रत्येक चालीचा वापर केला. मात्र रघुनंदन कोणतेही दडपण न घेता शांतपणे चाली रचून सर्वांनाच आश्चर्याच धक्का दिला. तब्बल
६५ चालींपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत रघुनंदनने कसलेल्या पंत्सुलेयाला चांगलेच झुंजवले. त्याचवेळी अन्य एका धक्कादायक निकालाने स्पर्धेत खळबळ माजली.
१७ वर्षांच्या रोहन अहुजाने सनसनाटी विजय मिळवताना ग्रँड मास्टर डॅनिएल सेमसीसेनचा पाडाव केला. डच डिफेन्स पद्धतीने सुरुवात करताना डॅनिएलने बचावात्मक पवित्रा घेतला खरा, मात्र रोहनने आक्रमण व बचावाचा ताळमेळ साधताना डॅनिएलला चुका करण्यास भाग पाडले.
२०व्या चालीपर्यंत सामना बरोबरीत सुरू होता. नेमकी याचवेळी केलेली एक चूक डॅनिएलला महागात पडली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना रोहनने सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला. यानंतर केवळ औपचारिकता राहिलेल्या सामन्यात जबरदस्त हल्ला करताना रोहनने ५४व्या चालीमध्ये विजय निश्चित केला. (क्रीडा प्रतिनिधी)