पंजाबचा ‘रॉयल’ विजय
By Admin | Updated: May 24, 2014 04:50 IST2014-05-24T04:50:31+5:302014-05-24T04:50:31+5:30
चमकदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा १६ धावांनी पराभव केला

पंजाबचा ‘रॉयल’ विजय
मोहाली : शॉन मार्श, वृद्धिमान साहा, जॉर्ज बेली व डेव्हिड मिलर यांच्या चमकदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा १६ धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या सातव्या पर्वात दहावा विजय मिळविताना गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले. राजस्थान रॉयल्सच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या प्ले-आॅफसाठी पात्र ठरण्याच्या आशा कायम आहेत. मुंबईचे १३ सामन्यांत १२ तर राजस्थानचे १३ सामन्यांत १४ गुण आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ४ बाद १७९ धावांची दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणार्या राजस्थान रॉयल्स संघाचा डाव ८ बाद १६३ धावांत रोखला. राजस्थान रॉयल्स संघातर्फे अजिंक्य रहाणे (२३), संजू सॅम्सन (३०), ब्रॅड हॉज (३१) व जेम्स फाकनर (नाबाद ३५) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. किंग्ज इलेव्हन पंजाब संघातर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज अक्षर पटेलने २४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. कर्णवीर सिंग व ऋषी धवन यांनी अनुक्रमे १६ व २५ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी घेत त्याला योग्य साथ दिली. त्याआधी, शॉन मार्श (४०), कर्णधार जॉर्ज बेली (नाबाद २६) व डेव्हिड मिलर (नाबाद २९) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने ४ बाद १७९ धावांची आव्हानात्मक मजल मारली. या लढतीपूर्वीच प्लेआॅफमध्ये स्थान निश्चित करणार्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने या लढतीत स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)