पंजाब विजयी
By Admin | Updated: April 9, 2017 03:54 IST2017-04-09T03:54:34+5:302017-04-09T03:54:34+5:30
कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (४४) आणि डेव्हिड मिलर (३0) यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आज येथे इंडियन प्रीमिअर लीग लढतीत रायझिंग

पंजाब विजयी
इंदौर : कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (४४) आणि डेव्हिड मिलर (३0) यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आज येथे इंडियन प्रीमिअर लीग लढतीत रायझिंग पुणे सुपर जायंट संघावर एक षटक व सहा गडी राखून मात केली.
फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर, पुणे सुपर जायंटने बेन स्टोक्सच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ६ बाद १६३ धावा केल्या; परंतु किंग्ज इलेव्हन पंजाबने मॅक्सवेल आणि मिलरच्या नाबाद खेळीच्या बळावर विजयी लक्ष्य १९ व्या षटकात ४ फलंदाज गमावून १६४ धावा करीत पूर्ण केले. मॅक्सवेलने त्याच्या खेळीत २0 चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि २ चौकार मारले, तर मिलरने २७ चेंडूंत २ षटकार व एक चौकार मारला. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी ४७ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली.
सलामीवीर हाशिम अमला (२८) यांनी चांगली सुरुवात केली; परंतु तिसऱ्याच षटकात मनन व्होरा (१४) तंबूत परतल्याने ही भागीदारी तुटली. रिद्धीमान साहा (१४) हादेखील जास्तवेळ टिकू शकला नाही आणि तो तीन षटकानंतर इम्रान ताहिर (२९ धावांत २ बळी) याच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला. ताहिरनेच अक्षर पटेल (२४) याच्या रूपाने दुसरा बळी घेतला. राहुल चाहरने अमलाच्या रूपाने एकमेव विकेट घेतली.
त्याआधी पुणे संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांचे नवव्या षटकातच ३ फलंदाज अवघ्या ४९ धावांवर परतले. त्यानंतर स्टोक्स (३२ चेंडूंत ५0) याने आक्रमक फलंदाजी केली. त्याला मनोज तिवारी (२३ चेंडूंत ४0 धावा) चांगली साथ मिळाली. तिवारी व डॅनियल क्रिस्टियन यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ३0 धावांची लूट केली.
तमिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याच्यासाठी आयपीएलची पदार्पणीय लढत संस्मरणीय ठरली. त्याने त्याचा पहिला बळी दोन चेंडूंच्या आत मिळवला. त्याने अजिंक्य रहाणे (१९) याला डिप कव्हरमध्ये झेलबाद केले. कर्णधार स्टीव्हन स्मिथ (२६) हादेखील चुकीचा फटका मारून तंबूत परतला. अनुभवी महेंद्रसिंहही लवकर बाद झाल्याने पुणे संघाची १२ व्या षटकांत ४ बाद ७१ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर १४ कोटी रुपयांत खरेदी करण्यात आलेल्या स्टोक्सने तिवारीच्या साथीने ३७ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी करीत पुणे संघाचा डाव सावरला. स्टोक्सने त्याच्या खेळीत ३ षटकार व २ चौकार मारले. तिवारीनेदेखील आक्रमक फलंदाजी करताना ३ चौकार व २ षटकार मारले. क्रिस्टियन याने संदीपच्या गोलंदाजीवर २ चौकार मारताना पुणे संघाला १६३ पर्यंत मजल मारुन दिली.
संक्षिप्त धावफलक
रायझिंग पुणे सुपर जायंट : २0 षटकांत ६ बाद १६३. (बेन स्टोक्स ५0, मनोज तिवारी नाबाद ४0, स्मिथ २६, रहाणे १९, क्रिस्टियन १७. संदीप शर्मा २/३३, अक्षर पटेल १/२७, टी. नटराजन १/२६, स्वप्नील सिंग १/१४).
किंग्ज इलेव्हन पंजाब : १९ षटकांत ४ बाद १६४. (ग्लेन मॅक्सवेल नाबाद ४४, डेव्हिड मिलर नाबाद ३0, हाशिम अमला २८, अक्षर पटेल २४. इम्रान ताहिर २/२९, दिंडा १/२६, चहर १/३२).