केकेआरविरुद्ध पंजाब आज लढत
By Admin | Updated: May 9, 2015 00:42 IST2015-05-09T00:42:21+5:302015-05-09T00:42:21+5:30
गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल ८ मध्ये ईडनवर शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळणार असून स्थानिक मैदानावरील हा

केकेआरविरुद्ध पंजाब आज लढत
कोलकाता : गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल ८ मध्ये ईडनवर शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळणार असून स्थानिक मैदानावरील हा अखेरचा सामना जिंकून ईडनला विजयी निरोप देण्याचा संघाचा निर्धार आहे.
गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या केकेआरला विजयासह प्ले आॅफ गाठायचे आहे. दुसरीकडे आरसीबीकडून १३८ धावांनी पराभूत झालेला पंजाब प्ले आॅफ शर्यतीबाहेर झाला आहे. उर्वरित चारही सामने त्यांना इभ्रत शाबूत ठेवण्यासाठीजिंकायचे आहेत.
मागच्या सामन्यात ख्रिस गेलने ५७ चेंडूत ११७ धावा ठोकत पंजाबला आरसीबीने मोठ्या फरकाने नमविले. गेलच्या तडाख्याने अस्ताव्यस्त झालेल्या पंजाबला मनोबल उंचावणे कठीण होऊन बसले. केकेआरने ईडनवर ६ पैकी एकच सामना गमावला व त्या सामन्यात गेलने तुफानी खेळ केला होता. त्यानंतर सलग ३ विजय नोंदविले व राजस्थानविरुद्धचा सामना पावासात वाहून गेला होता. केकेआरच्या गोलंदाजांनी वेळोवेळी देखणी कामगिरी केली आहे. सुनील नरेनला बीसीसीआयने तंबी देत क्लीन चिट दिल्यानंतर केकेआरने काल दिल्लीविरुद्ध ४ फिरकीपटू उतरवित शानदार विजय साजरा केला. लेगस्पिनर पीयूष चावला याने ४ बळी घेतले तर आॅस्ट्रेलियन ब्रॅड हॉग यानेही उत्कृष्ट मारा केला. या संघाचे गोलंदाज सांघिक खेळीत अपयशी ठरले; पण कुणी ना कुणी सामन्यात उपयुक्त फलंदाजी केली. युसूफ पठाणने काल २४ चेंडूत ४२ आणि योहान बोथाने पाच चेंडूत १७ धावांचे योगदान दिले.
ईडनच्या मंद खेळपट्टीवर उत्कृष्ट फिरकी गोलंदाजाची उणीव पंजाबला जाणवणार आहे. अक्षर पटेल आणि कर्णवीरसिंग यांना प्रभाव टाकता आला नाही. मागच्या सामन्यात गेलने दोघांच्या गोलंदाजीवर ९१ धावा केल्या होत्या. वेगवान मारा देखील प्रभावी दिसत नाही. मिशेल जॉन्सन लौकिकानुसार चमकलेला नाही. मागच्या पर्वात उपविजेता राहिलेल्या पंजाबने कोच संजय बांगरला श्रेय दिले होते. यंदा सर्वस्व पणाला लावल्यानंतरही संघाला यश मिळालेले नाही. बांगरच्या मते ‘आमच्यासाठी हे कठीण वर्ष आहे. सर्व उपाययोजना करूनही विजय मिळविणे कठीण जात आहे.’(वृत्तसंस्था)