पंजाब ‘रॉयल’, की राजस्थान ‘किंग’ आज ठरणार
By Admin | Updated: April 10, 2015 08:38 IST2015-04-10T01:45:35+5:302015-04-10T08:38:21+5:30
वीरेंद्र सेहवाग, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल जॉन्सन, अक्षर पटेल, मुरली विजय, डेव्हिड मिलरसारख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या गत उपविजेत्या किंग्ज

पंजाब ‘रॉयल’, की राजस्थान ‘किंग’ आज ठरणार
पुणे : वीरेंद्र सेहवाग, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल जॉन्सन, अक्षर पटेल, मुरली विजय, डेव्हिड मिलरसारख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या गत उपविजेत्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आपल्या होम ग्राऊंडवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिल्या लढतीसाठी सज्ज झाला आहे. मार्गदर्शक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसांपासून हा संघ पुण्यात तळ ठोकून आहे.
गहुंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मैदानावर गुरुवारी (दि. १०) रात्री होणाऱ्या या लढतीसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान परतावून लावण्यासाठी राजस्थानकडे शेन वॉटसन, अजिंक्य रहाणे, स्टीवन स्मिथ, जेम्स फॉकनर असे तगडे खेळाडू आहेत. कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने पंजाबची खेळी रॉयल होते की राजस्थान किंग ठरतो, याबाबत उत्सुकता आहे. राजस्थानमध्ये स्मिथचे एक प्रभावी अस्त्र आहे. सध्या तो चांगलाच बहरात आहे. स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९.८६ च्या सरासरीने २ हजार ९६ धावा फटकावल्या असून, त्यात ८ शतकांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत स्मिथने आॅस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ४०२ धावा फटकावल्या आहेत. याशिवाय राजस्थानने ख्रिस मॉरिस यालादेखील करारबद्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीची ताकद वाढली आहे. याशिवाय संघाकडे दिनेश साळुंखे व दिनेश साहू हे फिरकी गोलंदाज आहेत. कर्णधार शेन वॉटसन व स्टुअर्ट बिन्नी यांसारख्या खेळाडूंमुळे संघाची ताकद नक्कीच वाढलेली आहे.
गत आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करणारा किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेली, धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल, दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर, वीरेंद्र सेहवाग यांसारख्या किंग फलंदाजांची भक्कम फळी पंजाबकडे आहे. मुरली विजय, आॅस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सन यामुळे गोलंदाजीची धारदेखील वाढली आहे. दोन्ही
संघांत फलंदाजी व गोलंदाजीचे संतुलन दिसून येत आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी होणारा खेळ यावरच सरस संघ कोण
हे ठरेल.