‘पंजाब-हैदराबाद’ संग्राम आज

By Admin | Updated: April 27, 2015 01:18 IST2015-04-27T01:18:33+5:302015-04-27T01:18:33+5:30

‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमात कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद संघांदरम्यान आज,

'Punjab-Hyderabad' Sangram today | ‘पंजाब-हैदराबाद’ संग्राम आज

‘पंजाब-हैदराबाद’ संग्राम आज

मोहाली : ‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमात कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद संघांदरम्यान आज, सोमवारी लढत होणार आहे. उभय संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक असल्यामुळे लढत रंगतदार होईल, अशी चाहत्यांना आशा आहे.
गतउपविजेत्या पंजाब संघाला सहापैकी चार लढतींत पराभव स्वीकारावा लागला असून, गुणतालिकेत हा संघ तळाच्या स्थानावर आहे. हैदराबाद संघानेही चार सामने गमावले असले तरी सरस नेटरनरेटच्या आधारावर हा संघ पंजाबपेक्षा वरच्या स्थानी आहे. उभय संघांना गत सामन्यांमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
पंजाब संघाला चेन्नईविरुद्ध दारूण पराभव स्वीकारावा लागला. १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाचा डाव ९ बाद ९५ धावांत रोखला गेला. ‘आयपीएल’च्या आठ सत्रांमध्ये ही दुसरी नीचांकी धावसंख्या ठरली.
कागदावर बलाढ्य भासत असलेली पंजाब संघाची फलंदाजी या स्पर्धेत सपशेल अपयशी ठरली. रविवारी रात्री पंजाबच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना केवळ ४९ धावा करता आल्या. वीरेंद्र सेहवाग. डेव्हिड मिलर, शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार जॉर्ज बेली संघात परतल्यामुळे रविवारच्या सामन्यात मॅक्सवेलला विश्रांती देण्यात आली. परंतु, बेलीलाही काही चमक दाखविता आली नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पंजाबच्या गोलंदाजांचीही कामगिरी निराशाजनक ठरली. वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनही सपशेल अपयशी ठरला आहे. त्याने शनिवारी चार षटकांत ४० धावा बहाल केल्या आणि बळींचा विचार करता त्याची पाटी कोरीच राहिली. दुसऱ्या बाजूचा विचार करता हैदराबाद संघही अडचणीत आहे. हैदराबादची फलंदाजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर व सलामीवीर शिखर धवन यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. या दोघांची आतापर्यंतची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे; पण मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश संघासाठी चिंतेचा विषय आहे. गोलंदाजांनी यापूर्वीच्या लढतीच्या तुलनेत शनिवारी चांगली कामगिरी केली. डेल स्टेन व ट्रेंट बोल्ट यांनी चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Punjab-Hyderabad' Sangram today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.