पंजाब ‘चेन्नई एक्स्प्रेस’ रोखणार?
By Admin | Updated: April 25, 2015 09:31 IST2015-04-25T00:12:47+5:302015-04-25T09:31:08+5:30
विजयात सातत्य न राखू शकणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबला शनिवारी चेन्नई सुपरकिंग्सला त्यांच्याच मैदानावर पराभवाची धूळ चारण्यासाठी कठोर

पंजाब ‘चेन्नई एक्स्प्रेस’ रोखणार?
चेन्नई : विजयात सातत्य न राखू शकणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबला शनिवारी चेन्नई सुपरकिंग्सला त्यांच्याच मैदानावर पराभवाची धूळ चारण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. चेन्नईने पाचपैकी एकच सामना गमावला, तर पंजाबने पाचपैकी तीन सामने गमावल्याने हा संघ शेवटून तिसऱ्या स्थानावर आहे.
दोन वेळेचा चॅम्पियन चेन्नईची आतापर्यंतची वाटचाल चांगलीच राहिली. आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी धावा केल्या आहेत. मॅक्युलमने हैदराबादविरुद्ध जे शतक ठोकले, ते आयपीएल-८ मधील एकमेव शतक आहे. सुरेश रैना यालादेखील सूर गवसला; शिवाय महेंद्रसिंह धोनी संघाला गरज असेल तेव्हा मदतीला धावतो. गोलंदाजांनीही सर्वतोपरी योगदान दिले. वेगवान गोलंदाज आशिष नेहराने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चार गडी बाद केले .
दुसरीकडे, पंजाब संघ लय मिळविण्यासाठी झुंज देत आहे. गेल्या सामन्यात मात्र अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सला नमविल्याने पंजाबचा उत्साह वाढला. ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्म पंजाबसाठी चिंतेचा विषय ठरला. विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मॅक्सवेलने आयपीएलमध्ये अद्याप चमक दाखविलेली
नाही.
त्याच्याशिवाय कर्णधार वीरेंद्र सेहवाग यालादेखील मोठी खेळी करण्यात अपयश आले. गोलंदाजीत मिशेल जॉन्सनदेखील लौकिकास्पद कामगिरी करण्यात अपयशी
ठरला आहे. (वृत्तसंस्था)