पुणेकरांची दिल्लीस्वारी
By Admin | Updated: February 21, 2016 00:45 IST2016-02-21T00:45:14+5:302016-02-21T00:45:14+5:30
पुणेरी पलटणने नियोजनबद्ध खेळ करताना अडखळणाऱ्या दबंग दिल्लीचा यंदाच्या प्रो-कबड्डी लीगमध्ये दुसऱ्यांदा पाडाव करून ३२-२२ असा विजय मिळवला. या शानदार विजयासह पुणेकरांनी

पुणेकरांची दिल्लीस्वारी
- रोहित नाईक, जयपूर
पुणेरी पलटणने नियोजनबद्ध खेळ करताना अडखळणाऱ्या दबंग दिल्लीचा यंदाच्या प्रो-कबड्डी लीगमध्ये दुसऱ्यांदा पाडाव करून ३२-२२ असा विजय मिळवला. या शानदार विजयासह पुणेकरांनी गुणतक्त्यात २७ गुणांसह चौथ्या स्थानी झेप घेतली आहे, तर गतसामन्यात बंगळुरू बुल्सला नमवून यंदा पहिला विजय मिळवलेल्या दिल्लीने पुन्हा एकदा निराशा केली.
सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पुणेकरांनी सावध सुरुवात करताना दिल्लीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. दिल्लीनेदेखील बचावावर भर देत सामन्यास संथ सुरुवात केली. मध्यंतराच्या काही मिनिटांपूर्वीच पुणेकरांनी दिल्लीवर लोण चढवताना १६-७ अशी मजबूत आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व राखले. या वेळी पुणेकर सहज बाजी मारणार, असे चित्र होते. मात्र दिल्लीकरांनी झुंजार खेळ करताना सामन्यात पुनरागमाचे संकेत दिले.
संदीप धूल आणि कर्णधार रविंदर पहल यांनी केलेल्या दमदार पकडीच्या जोरावर पुण्याच्या आक्रमकांना रोखताना पुनरागमन केले. मात्र अतिआक्रमकपणाच्या नादात चुका झाल्याने पुण्याने पुन्हा एकदा
आघाडी वाढवून वर्चस्व मिळवले. त्यातच अखेरच्या मिनिटामध्ये पुणेकरांनी पुन्हा एकदा दिल्लीला लोण चढवताना विजयावर शिक्कामोर्तब केले.