आयपीएलमध्ये पुणे, राजकोटचे संघ खेळणार

By Admin | Updated: December 8, 2015 15:28 IST2015-12-08T14:20:50+5:302015-12-08T15:28:53+5:30

आयपीएलच्या पुढच्या दोन मोसमांमध्ये पुणे आणि राजकोट या शहरांचे संघ खेळताना दिसणार आहेत.

Pune, Rajkot will play in IPL | आयपीएलमध्ये पुणे, राजकोटचे संघ खेळणार

आयपीएलमध्ये पुणे, राजकोटचे संघ खेळणार

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ८ - इंडियन प्रिमीयर लीगच्या पुढच्या २०१६ आणि २०१७ च्या मोसमामध्ये पुणे आणि राजकोट हे दोन नवे संघ खेळताना दिसणार आहेत. बीसीसीआयच्या मंगळवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत या दोन शहरांच्या संघांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. हे दोन्ही संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सची जागा घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या तपासात चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघांनी आयपीएल स्पर्धेत गैरप्रकार केल्याचे आढळून आल्याने या दोन्ही संघांना पुढच्या दोन मोसमांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. 

पुणे संघांची मालकी संजीव गोएंका यांच्या न्यूरायजिंग आणि राजकोटची मालकी इंटेक्स मोबाईलकडे असेल. बीसीसीआयकडे जे प्रसारण हक्क आणि जाहीरातींच्या उत्पनात कमी वाटा मागतील त्यांना पहिले प्राधान्य मिळणार होते. या दोन्ही कंपन्या बीसीसीआयकडून एकही पैसा घेणार नसल्यामुळे त्यांची निवड झाली.  या दोन कंपन्यांच्या विक्रीसाठी बीसीसीआयने रिव्हर्स बिडींगची पध्दत अवलंबली होती. दोन्ही संघांसाठी ४० कोटीचे आधारभूत मूल्य निश्चित केले होते. या रक्कमेपेक्षा जो कमी रक्कम मागेल त्याला संघाची मालकी मिळणार होती. 
पुणे आणि राजकोट संघाने बीसीसीआयकडे एकही पैसा मागितला नाही. उलट न्यूरायजिंग पुढची दोन वर्ष प्रत्येकी दहा कोटी आणि इंटेक्स दोनवर्ष १६ कोटी बीसीसीआयला देणार आहेत. सुरुवातीला २० कंपन्यांनी रस दाखवला होता. मात्र शेवटी पाच कंपन्यांनी अर्ज भरले. दोन्ही नव्या संघांकडे चेन्नई आणि राजस्थान संघातील सर्वोत्तम पाच खेळाडू निवडण्याचा अधिकार असेल. या दोन्ही नव्या संघांना खेळाडू विकत घेण्यासाठी कमीत कमी ४० आणि जास्तीत जास्त ६६ कोटी रुपये खर्च करता येतील. हे दोन्ही संघआयपीएलमध्ये फक्त दोन वर्षांसाठी असतील. 

Web Title: Pune, Rajkot will play in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.