पुणे पेशवाजचा तिसरा विजय
By Admin | Updated: July 24, 2016 01:50 IST2016-07-24T01:50:53+5:302016-07-24T01:50:53+5:30
यजमान पुणे पेशवाजने शनिवारी हैदराबाद स्काय संघावर १०९-९९ने मात करीत प्रो बास्केटबॉल लीगमधील तिसऱ्या विजयाची नोंद केली.

पुणे पेशवाजचा तिसरा विजय
पुणे : यजमान पुणे पेशवाजने शनिवारी हैदराबाद स्काय संघावर १०९-९९ने मात करीत प्रो बास्केटबॉल लीगमधील तिसऱ्या विजयाची नोंद केली.
स्टार खेळाडू सिद्धांत शिंदेच्या अनुपस्थितीत पुण्याने आत्मविश्वास वाढविणाऱ्या विजयाची नोंद केली. पहिल्या क्वॉर्टरमध्ये २७-२२ अशी आघाडी घेत, यजमान संघाने सुरेख प्रारंभ केला. दोन्ही संघ हे या पूर्वीच प्ले-आॅफसाठी पात्र ठरलेले असल्याने सामन्यामध्ये अनेक प्रयोग पाहायला मिळाले. नरेंदर ग्रेवाल आणि अजिंक्य माने या दोघांनीही आज भन्नाट खेळ केला. हैदराबाद स्कायकडून थॉमसने पुण्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुण्याचे खेळाडू त्याला पुरून उरले.
दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये हैदराबादने सामन्यात मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. मध्यांतराला ४ मिनिटे शिल्लक असताना, महिपाल व महेश यांनी हैदराबादला ३९-३८ अशी अल्प आघाडी मिळवून दिली होती. मात्र, पुण्याच्या खेळाडूंनी ‘काउंटर अटॅक’ मध्यंतराला ५३-५२ अशी आघाडी घेतली. पुण्याने रिबाउंडमधून २१, तर टर्नओव्हरमधून २१ गुणांची कमाई केली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये हैदराबादच्या खेळाडूंनी मुसंडी मारत ७९-७७ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. चौथ्या आणि निर्णायक क्वार्टरमध्ये शेवटच्या क्वॉर्टरमध्ये पुण्याच्या खेळाडूंनी दर्जेदार खेळ करीत आपला क्लास दाखवून दिला. सामना संपण्यास २ मिनिटे शिल्लक असताना अजिंक्य व नरेंदर यांनी पुण्याला १० गुणांची आघाडी मिळवून दिली. ती भरून काढणे हैदराबादला शक्य झाले नाही. (क्रीडा प्रतिनिधी)
सलग तिसऱ्या लढतीत गुणांचे शतक
रविवारी (दि. २४) प्ले-आॅफमध्ये हे दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्याआधी दोन्ही संघांना आपली क्षमता जाणून घेण्याची चांगली संधी होती. पुणे संघाने प्ले-आॅफसाठी आपली सज्जता सिद्ध करताना, सलग तिसऱ्या सामन्यामध्ये शंभरपेक्षा अधिक गुणांची कमाई केली. हैदराबाद स्काय व पुणे पेशवाज यांच्यातील विजयी संघ चेन्नई स्लॅमशी भिडणार आहे.
निकाल : पुणे पेशवाज : १०९ ( नरेंदर ग्रेवाल २७, अजिंक्य माने १६, अर्जुन मेहता १४) विवि हैदराबाद स्काय : ९९ (महिपालसिंग २६, महेश २०, मनू थॉमस १७).