पुणे जायंट्सचे गुजरातला आव्हान
By Admin | Updated: April 14, 2016 02:56 IST2016-04-14T02:56:13+5:302016-04-14T02:56:13+5:30
आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून एकाच संघातून खेळणारे महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना गुरुवारी यंदाच्या सत्रात एकमेकांचे विरोधी म्हणून मैदानात उतरतील. त्यामुळे रैनाच्या गुजरात

पुणे जायंट्सचे गुजरातला आव्हान
राजकोट : आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून एकाच संघातून खेळणारे महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना गुरुवारी यंदाच्या सत्रात एकमेकांचे विरोधी म्हणून मैदानात उतरतील. त्यामुळे रैनाच्या गुजरात लायन्स विरुद्ध धोनीच्या राइझिंग पुणे सुपरजायंट्स समोरासमोर असतील. सुपरजायंट्सच्या अनुभवी कर्णधाराच्या समोर रैनाच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
धोनीच्या नेतृत्वाखालील पुणेकरांनी स्पर्धेतील पहिला विजय नोंदविताना गतविजेत्या बलाढ्य मुंबई इंडियन्सला नमवण्याची कामगिरी केली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला गुजरात लायन्सने देखील शानदार विजयी सलामी देताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा ५ विकेटने धुव्वा उडविला. मात्र, आता दोन्ही संघ विजयी लय कायम राखण्याच्या निर्धाराने खेळणार असल्याने यावेळी काँटे की टक्कर पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना आहे.
यजमान म्हणून खेळत असलेल्या गुजरात लायन्सला या सामन्यात घरच्या वातावरणाचा फायदा मिळेल. आतापर्यंत स्पर्धेतील सर्वांत यशस्वी फलंदाज ठरलेला आणि स्पर्धेतील एक सामना न सोडलेला कर्णधार सुरेश रैना गुजरातचा आधारस्तंभ आहे. पहिला सामना जिंकताना गुजरातला काहीप्रमाणात जोर लावावा लागला. त्यांचा सलामीवीर अॅरोन फिंचने वेगवान अर्धशतक झळाकावताना संघाला विजयासमीप नेले. त्याचवेळी युवा खेळाडू आणि भारताचा १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार इशान किशननेही चमकदार खेळ करताना गुजरातकडून छाप पाडली होती. शिवाय, स्टार अष्टपैलू ड्वेन ब्रावो, जेम्स फॉल्कनर, ब्रेंडन मॅक्क्युलम आणि रवींद्र जडेजा या कसलेल्या खेळाडूंचा सामना करणे पुणेकरांना निश्चित आव्हानात्मक ठरेल.
दुसरीकडे पुणे संघाने गतविजेत्यांना सहजपणे नमवताना जबरदस्त सुरुवात केली. विशेष म्हणजे, कोणत्याही सामन्याला आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या धोनीचे गुजरातपुढे मुख्य आव्हान असेल. पुणेकरांनी मुंबईविरुद्ध गोलंदाजी व फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे रविचंद्रन व मुरुगन ही आश्विन जोडी, फाफ डू प्लेसिस, मिशेल मार्श, केविन पिटरसन, स्टिव्ह स्मिथ, इशांत शर्मा आणि सध्या फॉर्ममध्ये असलेला भरवशाचा अजिंक्य रहाणे असे एकाहून एक बलाढ्य खेळाडूंचा समावेश असलेला पुणे संघ कागदावर तरी गुजरातच्या तुलनेत वरचढ दिसत आहे.
उभय संघ यातून निवडणार
राइझिंग पुणे सुपरजायंट्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अंकित शर्मा, बाबा अपराजित, रविचंद्रन आश्विन, मुरुगन आश्विन, अंकुश बैन्स, रजत भाटिया, स्कॉट बोलँड, दीपक चहार, अशोक दिंडा, फाफ डू प्लेसिस, पीटर हँड्सकॉम्ब, जसकरण सिंग, मिशेल मार्श, अॅल्बी मॉर्कल, इश्वर पांड्ये, इरफान पठाण, थिसारा परेरा, केविन पिटरसन, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, आर.पी. सिंग, स्टीव्ह स्मिथ, सौरभ तिवारी आणि अॅडम झम्पा.
गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), अक्षदीप नाथ, ड्वेन ब्राव्हो, पारस डोग्रा, एकलव्य द्विवेदी, जेम्स फॉल्कनर, अॅरोन फिंच, ईशान किशन, रवींद्र जडेजा, शादाब जकाती, दिनेश कार्तिक, शिवील कौशिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, सरबजीत लड्डा, ए. मिश्रा, ब्रँडन मॅक्क्युलम, प्रदीप सांगवान,
जयदेव शाह, उमंग शर्मा, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, प्रवीण तांबे आणि अँड्र्यु टाय.