फिरकीअस्त्राचे बुमरँग!

By Admin | Updated: February 25, 2017 01:31 IST2017-02-25T01:31:52+5:302017-02-25T01:31:52+5:30

आपण बनवलेले अस्त्र आपल्यावरच कसे उलटते, याची झलक भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात गहुंजे येथे सुरू असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहायला मिळाली

Punarabaragara Boomrang! | फिरकीअस्त्राचे बुमरँग!

फिरकीअस्त्राचे बुमरँग!

अमोल मचाले, पुणे
आपण बनवलेले अस्त्र आपल्यावरच कसे उलटते, याची झलक भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात गहुंजे येथे सुरू असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहायला मिळाली. भारतीय संघाच्या फायद्यासाठी तयार केलेल्या खेळपट्टीवर पहिल्या डावात आपल्याच फलंदाजांनी आॅस्ट्रेलियन फिरकीसमोर नांगी टाकली. चर्चेत नसलेला डावखुरा फिरकीपटू स्टीव्ह ओकेफीने अवघ्या ३५ धावांत ६ बळी घेत भारताचा पहिला डाव १०५ धावांवर गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली.
पहिल्या डावात १५५ धावांची आघाडी घेणाऱ्या आॅस्ट्रेलियाने दिवसअखेर ४ बाद १४३ धावा करीत आपली आघाडी २९८ वर नेऊन ठेवली. दोन्ही संघांचे मिळून दिवसभरात १५ फलंदाज बाद होणे, शुक्रवारच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. कालच्या ९ बाद २५६ वरून आश्विनने मिशेल स्टार्कला (६१) बाद करीत कांगारूंचा पहिला डाव २६० धावांवर संपविला. तो आश्विनचा तिसरा बळी ठरला.
प्रत्युत्तरात, भारतीय फलंदाज आज मोठी धावसंख्या उभारून पहिल्या डावात आघाडी घेणार, असे चित्र रंगवले जात होते. मात्र, आॅस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी सुमारे तासाभरातच ते चुकीचे ठरवले. मुरली विजय (१०), चेतेश्वर पुजारा (६) आणि कर्णधार विराट कोहली (०) हे परतल्यानंतर सलामीवीर के. एल. राहुलचा (६४) अपवाद वगळता उर्वरित फलंदाजांनी पाहुण्यांच्या फिरकीसमोर शरणागती पत्करली.
भारताला झटपट गुंडाळल्यानंतर दिवसअखेर पाहुण्यांनी ६ फलंदाज शिल्लक ठेवत आपली आघाडी तीनशेच्या घरात नेली आणि गोलंदाजधार्जिण्या खेळपट्टीवर विजयाची संधी निर्माण केली आहे. खेळ संपला तेव्हा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ५९ (११७ चेंडूंत ७ चौकार), तर मिशेल मार्श २१ (४८ चेंडूंत २ चौकार, १ षट्कार) धावांवर खेळत होते. भारतातर्फे आश्विनने ६८ धावांत ३, तर जयंत यादवने १ बळी घेतला.
फिरकी गोलंदाजी हे भारतीय संघाचे परंपरागत प्रमुख अस्त्र. या जोरावर दिग्गज संघांना अनेकदा आपण पाणी पाजले आहे, पण काही वेळा हे फिरकी अस्त्र आपल्यावरही उलटले आहे. आजदेखील तसेच झाले. ही करामत केली ती ३२ वर्षीय ओकेफी याने. त्याने फिरकी गोलंदाजी खेळण्यात माहीर समजल्या जाणाऱ्या भारतीय फलंदाजांना आपल्या तालावर अक्षरश: नाचवले.


कांगारूंच्या फास्टर्सचा धडाका, राहुलचा प्रतिकार
दिवसाच्या पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्टार्कला बाद करून अश्विनने आॅस्ट्रेलियाच्या डावाला पूर्णविराम दिला.
खेळपट्टीचा नूर बघून आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने ओकेफीला दुसऱ्या षटकापासूनच गोलंदाजीला आणले. १४० ते १४७ किलोमीटर प्रति तास वेगाने गोलंदाजी करणारा स्टार्क आणि दुसरीकडे हातभार चेंडू वळवणारा ओकेफी यांची प्रारंभीची षटके मुरली विजय-राहुल यांनी सावधपणे खेळून काढली. स्टार्कच्या ३ षटकांनंतर गोलंदाजीला आलेल्या जोश हेजलवूडने विजयला आपल्या जाळ्यात अडकवले. आॅफ स्टम्पबाहेरील चेंडूवर त्याने यष्टिरक्षकाकडे झेल दिला.पुन्हा गोलंदाजीला आलेल्या स्टार्कने टाकलेले १५ वे षटक भारतीय क्रिकेटप्रेमींची निराशा करणारे ठरले. सध्या फॉर्मात असलेल्या पुजाराला त्याच्या छातीएवढा उंच उसळलेल्या चेंडूचा नीट अंदाज आला नाही. ग्लोव्हजला चाटून गेलेला चेंडू यष्टीमागे वेडने झेलला. २ बाद ४४ अशा स्थितीतून कोहली बाहेर काढेल, असे वाटत असतानाच स्टार्कने त्याच षटकात तमाम भारतीयांच्या अपेक्षांना सुरूंग लावला. आॅफ स्टंपच्या खूप बाहेर असलेल्या चेंडूचा पाठलाग करून कोहलीने विकेट फेकली. पहिल्या स्लीपमध्ये उभ्या हॅण्डस कोम्बने आपले काम चोख बजावले. २ चेंडू खेळणाऱ्या कोहलीला भोपळाही फोडता आला नाही.१५व्या षटकातच ३३ धावांत ३ मोहरे गमावल्याने भारत बॅकफूटवर आला, पण त्यानंतर राहुल-अजिंक्य जोडीने किल्ला लढवत पडझड टाळली. अजिंक्यच्या तुलनेत अधिक सहज खेळणाऱ्या राहुलने काही प्रेक्षणीय फटके लगावले.


भारताची घसरगुंडी, ओकेफीचा ‘षट्कार’
पहिल्या सत्राअखेर ४७ धावांवर नाबाद असलेल्या राहुलने उपाहारानंतर तिसऱ्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ३३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ओकेफीला सरळ मैदानाबाहेर भिरकावून देण्याच्या प्रयत्नात त्याचा फटका चुकला. बॅटची कड घेऊन उडालेला चेंडू लॉंग आॅफवरून पुढे धावत येत वॉर्नरने आरामात झेलला. भारत ४ बाद ९४. इथून सुरू झालेली घसरगुंडी थेट भारताचा डाव संपूनच थांबली.
राहुल परतल्यावर एका चेंडूच्या अंतराने अजिंक्यनेही पॅव्हेलियनचा रस्ता धरला. ५ बाद ९५. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर तिसरा बळी घेत ओकेफीने साहाला आल्यापावली शून्यावर माघारी परतवले. ६ बाद ९६. खेळपट्टीचा पुरेपूर लाभ उठवणाऱ्या ओकेफीचा हा स्पेल कांगारूंना सामन्यावर पकड मिळवून देणारा ठरला. लिआॅनने अश्विनला बाद करून भारताची अवस्था ७ बाद ९५ अशी केली. २ षटकात एका धावेच्या मोबदल्यात भारताने ४ फलंदाज गमावले. यानंतर ओकेफीने प्रत्येक षटकात १ बळी घेत भारताला गुंडाळले. ३७व्या षटकात जयंत यादवला यष्टिचित करवल्यानंतर ३९व्या षटकात जडेजाला उत्तुंग फटका मारण्याच्या मोहात अडकवून डीप मिडविकेटला झेलबाद केले. हा त्याचा पाचवा बळी ठरला. ४१व्या षटकात उमेशला झेलबाद करीत त्याने भारताचा डज्ञव संपविला.
पहिल्या षटकापासून दोन्ही बाजूने फिरकी आक्रमण लावणाऱ्या कोहलीच्या चेहऱ्यावर आश्विनने पहिल्याच षटकात हसून फुलविले. २ चौकार लगावणाऱ्या धोकादायक वॉर्नरला (१०) त्याने पायचित पकडले. आश्विननेच सातव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शॉन मार्शला शून्यावर बाद करून कांगारूंची अवस्था २ बाद २३ अशी केली.


स्मिथ चिकटला, भारताचे फिरकीपटू अपयशी
दुसऱ्या डावात दोन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने फिरकीला साथ देणारा खेळपट्टीवर आपले चिवट फलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखविले. त्याला हॅण्ड्कोम्ब (३४ चेंडूंत १९, आणि रेनशॉ (५० चेंडूंत ३१) यांनी चांगली साथ दिली. त्यांच्या या प्रयत्नांना साथ लाभली ती भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाची. एकट्या स्मिथला आश्विनच्या गोलंदाजीवर दोनदा, तर जडेजाच्या गोलंदाजीवर एकदा जीवदान मिळाले. याचा लाभ घेत त्याने नाबाद अर्धशतक साकारले. दरम्यान, २१ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हँण्ड्सकोम्बला बाद करीत आश्विनने तिसरा बळी नोंदविला. उसळलेला चेंडू फ्लिक करण्याच्या प्रयत्नात त्याने लेग गलीमध्ये विजयकडे झेल दिला. जयंत यादवने रेनशॉला झेलबाद करीत त्याची स्मिथसोबतची ५२ धावांची भागिदारी संपविली. नशीब जोरावर असल्याने तिसऱ्या सत्रात फिरकीपटूंच्या अनेक चांगल्या चेंडूवर कांगारू बाद होता होता बचावले.


‘सब कुछ ओकेफी
दुसऱ्या सत्रात भारताने गमावलेल्या ७ फलंदाजांपैकी नॅथन लिआॅन याने अश्विनला बाद केल्याचा अपवाद वगळता ‘सब कुछ ओकेफी’ असेच चित्र होते.
रहाणे (१३), विजय (१०), पुजारा (६), कोहली (०), आश्विन (१), साहा (०), जडेजा (२) या आघाडीच्या तसेच मध्यफळीतील ७ फलंदाजांनी मिळून ३२ धावांचे योगदान दिले. भारताच्या डावात केवळ ३ फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले.
३ बाद ९४ वरून भारताने अखेरचे ७ फलंदाज ४९ चेंडूंत ११ धावांच्या अंतराने बाद झाले.


आजचा दिवस आमचा नव्हता : कुंबळे
आजचा दिवस आमचा नव्हता. १९ सामने अपराजित असलेल्या संघाच्या वाट्याला एखादा वाईट दिवसदेखील येऊ शकतो, अशा शब्दांत प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाचा बचाव केला. दिवसाच्या खेळानंतर कुंबळे म्हणाले, ‘‘राहुल आणि अजिंक्य खेळत असताना आम्ही चांगल्या स्थितीत होतो. मात्र, राहुल बाद होताच ४ फलंदाज झटपट गमावले. यामुळे टीम बॅकफूटवर गेली. फलंदाजीस अवघड खेळपट्टीवर संयमाने खेळ केला असता, तर धावा झाल्या असत्या. तिसऱ्या दिवशी पाहुण्यांचे ६ फलंदाज झटपट बाद करून सामन्यात परतण्याचा आमचा प्रयत्न असेल.’’


धावफलक
आॅस्ट्रेलिया : पहिला डाव (कालच्या ९ बाद २५६ वरून पुढे) : मिशेल स्टार्क झे. जडेजा गो. आश्विन ६१, हेजलवूड नाबाद १. अवांतर : १५. एकूण : ९४.५ षटकांत सर्वबाद २६०. गोलंदाजी : इशांत शर्मा ११-०-२७-०. रवीचंद्रन अश्विन ३४.५-१०-६३-३. जयंत यादव १३-१-५८-१. रवींद्र जडेजा २४-४-७४-२. उमेश यादव १२-३-३२-४.
भारत : पहिला डाव : मुरली विजय झे. वेड गो. हेजलवूड १०, के. एल. राहुल झे. वॉर्नर गो. ओकेफी ६४, पुजारा झे. वेड गो. स्टार्क ६, कोहली झे. हॅण्ड्सकोम्ब गो स्टार्क ०, रहाणे झे. हॅण्ड्सकोम्ब गो. लिआॅन, साहा झे. स्मिथ गो. ओकेफी ०, जडेजा झे. स्टार्क गो. ओकेफी २, जयंत यादव यष्टिचित वेड गो. ओकेफी २, उमेश यादव झे. स्मिथ गो. ओकेफी ४, इशांत नाबाद २. अवांतर : १. ४१.१ षटकांत सर्वबाद १०५. गडी बाद क्रम : १/२६, २/४४, ३/४४, ४/९४, ५/९५, ६/९५, ७/९५, ८/९८, ९/१०१, १०/१०५. गोलंदाजी : स्टार्क ९-२-३८-२. ओकेफी १३.१-२-३५-६. हेजलवूड ७-३-११-१. लिआॅन ११-२-२१-१.
आॅस्ट्रेलिया : दुसरा डाव : वॉर्नर पायचित गो. आश्विन १०, शॉन मार्श पायचित गो. आश्विन ०, स्मिथ खेळत आहे ५९, हॅण्ड्सकोम्ब झे. विजय गो. आश्विन १९, रेनशॉ झे. इशांत गो. जयंत यादव ३१, मिशेल मार्श खेळत आहे २१. अवांतर : ३. एकूण : ४६ षटकांत ४ बाद १४३. गोलंदाजी : आश्विन १६-३-६८-३. जडेजा १७-६-२६-०. उमेश यादव ५-०-१३-०. जयंत यादव ५-०-२७-१. इशांत ३-०-६-०.

Web Title: Punarabaragara Boomrang!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.