भारतात स्क्वॉशला व्यावसायिक स्वरूप
By Admin | Updated: September 11, 2014 01:55 IST2014-09-11T01:55:30+5:302014-09-11T01:55:30+5:30
भारतात स्क्वॉशला मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पहिल्यावहिल्या स्क्वॉश सर्किटचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतात स्क्वॉशला व्यावसायिक स्वरूप
मुंबई : भारतात स्क्वॉशला मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पहिल्यावहिल्या स्क्वॉश सर्किटचे आयोजन करण्यात आले आहे. जेएसडब्लू इंडियन चॅलेंजर सर्किट असे नाव असलेली ही स्पर्धा पुढील महिन्यात चार लीगमध्ये जयपूर, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भारतात स्क्वॉशला व्यावसायिक स्वरूप मिळणार आहे.
भारतात पहिल्यांदा व्यावसायिक स्क्वॉश संघटना (पीएसए) व महिला स्क्वॉश संघटना (डब्लूएसए) यांच्या सलग चार स्पर्धा होत आहेत. या सर्किटच्या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार असल्याचे माजी राष्ट्रीय चॅम्पियन ऋत्विक भटाचार्य यांनी सांगितले. मुंबईत बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेती दीपिका पल्लीकल, सौरव घोष या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती होती. या सर्किटचा शुभारंभ २ आॅक्टोबरला जयपूर येथून होणार असून, २९ आॅक्टोबरला चेन्नईत याची सांगता होणार आहे. जयपूर येथे २ ते ५ आॅक्टोबर, मुंबईत ९ ते १२ आॅक्टोबर (जुहू-विलेपार्ले जिमखाना) आणि १६ ते १९ आॅक्टोबर (एनएससीआय) आणि चेन्नईत २६ ते २९ आॅक्टोबर या कालावधीत चार लीग स्पर्धा पार पडणार आहे. प्रत्येक लीग १६ पुरुष व १६ महिला खेळाडूंचा सहभाग असून, ११ खेळाडूंना थेट प्रवेश मिळणार आहे, तर एक खेळाडू वाइल्ड कार्ड एन्ट्रीने व उर्वरित ४ पात्रता फेऱ्यांचा अडथळा पार करून खेळणार आहेत. पहिल्या ३ लीगमधील पुरुष गटातील विजेत्या खेळाडूला १० हजार डॉलर बक्षीस रकमेसह १७५ गुणही मिळणार आहेत, तर अंतिम लीगमधील विजेत्याला ३५० गुण मिळणार आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)