राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंचा गौरव
By Admin | Updated: August 30, 2014 04:21 IST2014-08-30T04:03:25+5:302014-08-30T04:21:20+5:30
अर्जुन पुरस्कार प्रदान : टिंटू लुका, जय भगवान, टॉम जोसेफ मानकरी

राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंचा गौरव
नवी दिल्ली : खेळाडूंच्या निवडीबाबत वाद आणि २० वर्षांत प्रथमच खेलरत्न पुरस्कारासाठी निवड न होणे, यासारख्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित समारंभात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले.
भुतकाळाप्रमाणे यावेळी पुरस्काराच्या निवडीबाबतचा वाद चर्चेचा केंद्रबिंदू होता. बॉक्सर मनोज कुमारने नव्या गुणांकन पद्धतीनुसार पात्र असल्यानंतरही अर्जुन पुरस्कार जाहीर न झाल्यामुळे क्रीडा मंत्रालयाविरुद्ध न्यायालयाचे दारा ठोठावले. या व्यतिरिक्त निवड समितीला यंदा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्नसाठी एकही योग्य खेळाडू गवसला नाही. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी १२ सदस्यांच्या समितीपुढे ७ नावे होती, पण त्यापैकी एकाही खेळाडूंच्या नावावर एकमत झाले नाही. त्यामुळे १९९४ नंतर प्रथमच या पुरस्कारासाठी एकाही खेळाडूच्या नावाची शिफारस करण्यात आली नाही. वादानंतरही समारंभाची परंपरा कायम राखताना विजेत्यांना अतिथींच्या उपस्थितीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित अतिथींमध्ये उपराष्ट्रपती एम. हामिद अन्सारी व क्रीडा मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचा समावेश होता. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत संघात समावेश असलेला फिरकीपटू आर. अश्विन या कार्यक्रमात सहभागी झाला नव्हता.
राष्ट्रपतींच्या हस्ते अखिलेश वर्मा (तिरंदाज), टिंटू लुका (अॅथ्लेटिक्स), एच.एन. गिरीशा (पॅरालिम्पिक), व्ही. दीजू (बॅडमिंटन), गीतू आॅन जोस (बॉस्केटबॉल), जय भगवान (बॉक्सिंग), अनिर्बान लाहिडी (गोल्फ), ममता पुजारी (कबड्डी), साजी थॉमस (रोर्इंग), हिना सिद्धू (नेमबाजी), अनाका अलंकामोनी (स्क्वाश), टॉम जोसेफ (व्हॉलिबॉल), रेणुबाला चानू (भारोत्तोलन) व सुनील राणा (कुस्ती) यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. अर्जुन, द्रोणाचार्य व ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रतिमा, सन्मानपत्र आणि पाच लाख रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना चषक प्रदान करण्यात आले.
महान क्रिकेटपटू कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीमध्ये अंजू बॉबी जॉर्ज व कुंजरानी देवी यांच्यासारख्या माजी खेळाडूंसह प्रसारमाध्यमांच्या दोन आणि सरकारच्या तीन प्रतिनिधींचा समावेश होता. भारतीय क्रीडा प्राधिकरणचे महासंचालक जिजी थॉम्सन यांचाही या समितीमध्ये समावेश होता. राष्ट्रकुल २०१० मध्ये कांस्यपदकाच मान मिळविणारा बॉक्सर जयभगवानची निवड करण्यात आली तर याच स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या मनोजकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या व्यतिरिक्त २० वर्षीय स्क्वॉशपटू अनाका अलंकामोनीची निवड करण्यात आल्यामुळेही वाद निर्माण झाला. (वृत्तसंस्था)