‘रियो आॅलिम्पिक’ची तयारी फेब्रुवारीपासून करणार
By Admin | Updated: January 26, 2015 04:09 IST2015-01-26T04:09:19+5:302015-01-26T04:09:53+5:30
पुढील वर्षी ब्राझील येथे (रियो) होणार असलेल्या आॅलिम्पिक स्पर्धेची तयारी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे

‘रियो आॅलिम्पिक’ची तयारी फेब्रुवारीपासून करणार
पुणे : पुढील वर्षी ब्राझील येथे (रियो) होणार असलेल्या आॅलिम्पिक स्पर्धेची तयारी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. सध्या मनगटाच्या दुखापतीपासून सावरत असून, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर तंदुरुस्ती चाचणी होईल.
‘तमाम भारतीयांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आॅलिम्पिक पदक जिंकून मी सार्थ करीन,’
अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय मुष्ठियोद्धा लाइश्राम सरितादेवी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
सरितादेवी यांनी रविवारी सकाळी ‘लोकमत’च्या कार्यालयाला भेट दिली. या वेळी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींशी संवाद साधत ‘एक खेळाडू व एक व्यक्ती’ म्हणून आपली मते मांडली. ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक मिलन दर्डा, सरितादेवीचे पती चाँगथम थोयबा, ‘गिरिप्रेमी’चे उमेश झिरपे उपस्थित होते. सरितादेवींना नोव्हेंबर २०१४ महिन्यात मनगटाला दुखापत झाली आहे. या विषयी सरितादेवी म्हणाल्या, दुखापतीमुळे फेब्रुवारीपर्यंत विश्रांती करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. येत्या ९ फेब्रुवारीनंतर तंदुरुस्ती चाचणी होईल. तेथून खऱ्या अर्थाने आॅलिम्पिकच्या तयारीस सुरुवात होईल. दरम्यान, घरी व बेंगलोर येथे सरावाची तयारी केली आहे. त्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. भारतीयांकडून मला खूप प्रेम मिळाले. त्यांनी दाखविलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेन.
सराव करायचा म्हटला, तरी काही खर्च येतोच. त्यामुळे सतत पैसे उभारण्यास खटपट करावी लागायची. आर्थिक अडचणींमुळे प्रत्येक स्पर्धेला पैशासाठी रडण्याची वेळ यायची. आज राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पदके मिळाल्यामुळे माझी ती स्थिती नाही. खरंच सांगते गरीब खेळाडू केवळ पैशाअभावी खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. अशा खेळाडूंना समाजातून मदत झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)