वानखेडेवर प्रविणचे ‘सोनेरी’ कामगिरीचे लक्ष्य

By Admin | Updated: May 25, 2014 04:25 IST2014-05-25T04:25:20+5:302014-05-25T04:25:20+5:30

‘नाव’ कमविण्यासाठी तब्बल दोन दशके संघर्ष करणार्‍या प्रवीण तांबेला आता अख्खं जग ओळखते आहे.

Praveen's 'golden' performance goals at Wankhede | वानखेडेवर प्रविणचे ‘सोनेरी’ कामगिरीचे लक्ष्य

वानखेडेवर प्रविणचे ‘सोनेरी’ कामगिरीचे लक्ष्य

विनय नायडू, मुंबई - ‘नाव’ कमविण्यासाठी तब्बल दोन दशके संघर्ष करणार्‍या प्रवीण तांबेला आता अख्खं जग ओळखते आहे. ‘आयपीएल’मुळे आयुष्याचे सोने झालेला प्रवीण तांबे आता राजस्थान रॉयल्सचा अविभाज्य घटक बनला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याची गुणवत्ता जाणली आणि त्याला संधी दिली. तो आता त्याचे पुरेपूर ‘रिटर्न्स’ देत आहे. राजस्थान रॉयल्सची गाडी ‘प्लेआॅफ’च्या स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या अवस्थेत असताना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात प्रवीण तांबेने हॅट्ट्रिक नोंदवून संघाला विजयी मार्गावर आणले. मुंबई संघाविरुद्धचा रविवारी होणारा सामना तांबेसाठी ‘स्पेशल’ असणार आहे. तोही या लढतीकडे मोठ्या आशेने पाहत आहे. सहा महिन्यांपूर्वी तांबेने याच मैदानावर ओरिसा संघाविरुद्ध मुंबईकडून प्रथम श्रेणीचा पहिला सामना खेळला होता. तसेच त्याची मुंबई रणजी संघाकडून पहिली निवड २000 साली झाली होती; परंतु निवडकर्त्यांचे दुर्लक्ष आणि तगडी स्पर्धा यामुळे त्याला राखीव बेंचवरूनच परतावे लागले होते. त्यानंतर १३ वर्षे या हिर्‍यावर धूळ जमून तो काळवंडला होता; पण राहुल द्रविड नामक जवाहिर्‍याने ही धूळ दूर केली. २0१३ साली त्याला राजस्थानकडून द्रविडने संधी दिली आणि हा हिरा चमकू लागला. ‘आयपीएल’च्या यशामुळे त्याला मुंबई संघाची दारे उघडी झाली आणि सहा महिन्यांपूर्वी वसिम जाफरच्या हस्ते त्याने ‘एमसीए’ची कॅप डोक्यावर चढविली. वसिम जाफर तांबे विषयी म्हणतो, त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. चेंडूची विविधता असलेला तो लेगस्पिनर आहे. प्रसंगी चांगली फलंदाजीही तो करू शकतो. तो रणजी संघातील सर्वांत ज्येष्ठ खेळाडू असल्याने युवा खेळाडू त्याच्या संयमाबद्दल आदर बाळगून आहेत. तांबेचा लेगस्पिन आणि फ्लिपर्स सर्वांना आकर्षित करून घेत असला, तरी त्यांने आपल्या कारकिर्दीची सुरुवात जलदगती गोलंदाज म्हणून केली होती. हे खूप कमी लोकांना माहीत आहे. तो ज्या ओरियंट शिपिंग कंपनीकडून खेळायचा, त्या संघाचा कर्णधार अजय कदम यांने त्याला फिरकी गोलंदाज होण्याचा सल्ला दिला, म्हणून तो फिरकीकडे वळला. शिवाजी पार्कवर माजी कसोटीपटू संदीप पाटील यांच्याकडूनही त्याला अनुभवाचे बोल ऐकण्यास मिळाले आहेत. जिथे ४0 व्या वर्षी सचिन तेंडुलकरने आपला प्रवास थांबविला. तेथे बर्‍या वाईट अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेला प्रवीण तांबेने ४१ व्या वर्षी आपला प्रवास सुरू केला असून, अजून त्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे.

Web Title: Praveen's 'golden' performance goals at Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.