प्रग्यानने घेतली कांगारूंची फिरकी

By Admin | Updated: July 23, 2015 23:05 IST2015-07-23T23:05:11+5:302015-07-23T23:05:11+5:30

आॅस्टे्रलिया ‘अ’ संघाविरुध्द पहिल्या डावात ३०१ धावांची मजल मारल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर भारत ‘अ’ संघाने प्रग्यान ओझाच्या फिरकीच्या

Pranganane kangaruera spin | प्रग्यानने घेतली कांगारूंची फिरकी

प्रग्यानने घेतली कांगारूंची फिरकी

चेन्नई : आॅस्टे्रलिया ‘अ’ संघाविरुध्द पहिल्या डावात ३०१ धावांची मजल मारल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर भारत ‘अ’ संघाने प्रग्यान ओझाच्या फिरकीच्या जोरावर पहिल्या चार दिवसीय सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर आॅस्टे्रलियाची ४ बाद १८५ अशी अवस्था केली. आॅसी संघ अजूनही ११६ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सहा फलंदाज अद्याप बाकी आहेत. दरम्यान, स्टीव्ह ओकीफीने (६/८२) भेदक मारा करत यजामानांना ३०१ धावांवर रोखले.
चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ६ बाद २२१ या धावसंख्येवरुन सुरुवात करताना अखेरचे ४ फलंदाज ८० धावांत परतल्याने भारताचा डाव ३०१ धावांत संपुष्टात आला. विजय शंकरने अखेरपर्यंत नाबाद राहताना १३५ चेंडूंत ५ चौकार व एक षटकार खेचून ५१ धावांची खेळी साकारली. अमित मिश्राने ९३ चेंडूंत १ चौकारासह २७ धावांची संथ खेळी केली. ओकीफीने ८२ धावांत ६ बळी घेत भारताची शेवटची फळी अक्षरश: कापून काढली. अँड्र्यू फेकेटेने २ बळी घेतले.
यानंतर आॅस्टे्रलिया ‘अ’ संघाला सुरुवातीला धक्के देण्यात भारतीयांना यश आले. अचूक मारा करुन आॅसींना जखडवून ठेवल्यानंतर अभिमन्यू मिथूनने कॅमेरुन बँक्रॉफ्टला बाद करुन आॅसींना १ बाद ७ धावा असा धक्का दिला. उस्मान ख्वाजा आणि ट्राविस हेड यांनी दुसऱ्या विकेट्साठी ५० धावांची भागीदारी केली. या वेळी प्रग्यान ओझाने आपली जादू दाखवताना दोघांनाही ठराविक अंतराने बाद केले आणि लगेच नीक मॅडीनसनला भोपळाही न फोडू न देता माघारी धाडले. यामुळे आॅसींची १ बाद ७ वरुन ४ बाद ७५ अशी अवस्था झाली. दरम्यान पीटर हँडकॉमने झुंजार अर्धशतक झळकावून मार्कस स्टॉइनीससोबत पाचव्या विकेटसाठी नाबाद ११० धावांची भागीदारी करून संघाला सावरले. हँड्सकॉम १३७ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह ७५ धावा काढून खेळपट्टीवर टिकून असून स्टॉइनीस ८७ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ४२ धावा काढून त्याला उत्तम साथ देत आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ (पहिला डाव) : सर्वबाद ३०१ धावा (लोकेश राहूल ९६, चेतेश्वर पुजारा ५५, विजय शंकर नाबाद ५१, श्रेयश अय्यर ३९; स्टीव्ह ओकीफी ६/८२, अँड्र्यू फेकेटे २/४२.)
आॅस्टे्रलिया ‘अ’ (पहिला डाव) : ४ बाद १८५ धावा (पीटर हँडकॉम खेळत आहे ७५, मार्कस स्टॉइनीस खेळत आहे ४२, ट्राविस हेड ३१; प्रग्यान ओझा ३/५२, अभिमन्यू मिथून १/२१)

Web Title: Pranganane kangaruera spin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.