प्रणयने दिला आॅलिम्पिक चॅम्पियनला धक्का
By Admin | Updated: October 22, 2015 01:03 IST2015-10-22T01:03:01+5:302015-10-22T01:03:01+5:30
भारताच्या एच. एस. प्रणय याने फ्रेंच ओपन स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद करताना चीनच्या लिन डैन या आॅलिम्पिक चॅम्पियनला नमवले. त्याचवेळी

प्रणयने दिला आॅलिम्पिक चॅम्पियनला धक्का
पॅरीस : भारताच्या एच. एस. प्रणय याने फ्रेंच ओपन स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद करताना चीनच्या लिन डैन या आॅलिम्पिक चॅम्पियनला नमवले. त्याचवेळी जागतिक बॅडमिंटनमधील अव्वल महिला खेळाडू सायना नेहवालने शानदार विजयी सलामी दिली. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेत्या पारुपल्ली कश्यपनेही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी पाचव्या मानांकीत के. श्रीकांत याचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
पुरुष एकेरीमध्ये बिगरमानांकीत प्रणयने अनपेक्षित निकाल लावताना तृतीय मानांकीत डैनला धक्का देत खळबळ माजवली. तीन सेटपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतरही त्याने कडवी झुंज देत सलग दोन सेटमध्ये बाजी मारुन १४-२१, २१-११, २१-१७ असा सनसनाटी विजय मिळवला.
महिला गटात अव्वल खेळाडू सायनाने कॅनडाच्या मिशेल ली हिचा ४२ मिनीटांपर्यंत रंगलेल्या एकतर्फी सामन्यात २१-१८, २१-१३ असा धुव्वा उडवला. पहिल्या सेटमध्ये मिशेलने अनुभवी सायना कडवी झुंज दिली खरी, मात्र यानंतर सायनाने आपला हिसका दाखवताना सहज बाजी मारली. पहिल्या सेटमध्ये एकवेळ मिशेल ७-३ अशी आघाडीवर होती.
आठव्या मानांकीत कश्यपनेही सामन्यात एकहाती वर्चस्व राखत फ्रान्सच्या थॉमस रोक्सेलचा ४१ मिनिटांत २१-११, २२-२० असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारल्यानंतर कश्यपला दुसऱ्या सेटमध्ये कडव्या झुंजीस सामोरे जावे लागले. मात्र अनुभवाच्या जोरावर कश्यपने विजयी कूच केली.
त्याचवेळी पाचव्या मानांकीत के. श्रीकांतला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात श्रीकांतला चीनच्या बिगरमानांकीत तियान हुवेईने नमवले. तियानने पहिला सेट जिंकून सामन्यात आघाडी घेतल्यानंतर श्रीकांतने सामना बरोबरीत आणला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये तियानपुढे निभाव न लागल्याने श्रीकांतचा १५-२१, २१-१३, ११-२१ असा पराभव झाला.