क्रीडा सराव
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30
विश्रांतीनंतर टीम इंडियाचा सराव

क्रीडा सराव
व श्रांतीनंतर टीम इंडियाचा सरावसिडनी : भारतीय संघावर आयसीसी विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्याचे दडपण जाणवत आहे. तिरंगी मालिकेत भारतीय संघाला पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. यानंतर खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी टीम इंडियाने सिडनी क्रिकेट मैदानावर शुक्रवारी कसून सराव केला. भारताला यानंतर सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळावा लागणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवाची मालिका खंडित करण्यास प्रयत्नशील आहे. टीम इंडियाला कसोटी मालिकेत ०-२ ने पराभव स्वीकारावा लागला तर गत विश्वकप विजेत्या संघाला वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत पहिल्या दोन्ही लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मते हे सराव सत्र एच्छिक होते, पण सरावासाठी संघातील बरेच खेळाडू मैदानावर उपस्थित होते. विराट कोहली, रविचंद्रन अश्विन व रोहित शर्मा सरावासाठी उपस्थित नव्हते. दुसऱ्या लढतीत इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारणारा भारतीय संघ विश्रांतीनंतर सरावासाठी मैदानात दाखल झाला. भारतीय खेळाडूंनी आज फलंदाजी व गोलंदाजीचा सराव केला. नेट्समध्ये अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल आणि सुरेश रैना यांनी फलंदाजीचा सराव केला. बिन्नीने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीवर सराव केला तर गेल्या दोन्ही वन-डे लढतींमध्ये खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या अक्षर पटेलने कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह काही फिरकीपटूंसोबत सराव केला. भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळविण्याचे लक्ष्य आहे. पुढील महिन्यात प्रारंभ होत असलेल्या विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची सध्याची कामगिरी चिंताजनक आहे. अष्टपैलू रैनाने जवळजवळ एक तास प्रशिक्षक व फिरकीपटूंसह फलंदाजीचा सराव केला. रैनाने वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी केली. खांद्याच्या दुखापतीतून सावरत असलेल्या रवींद्र जडेजाने आजा नेट्समध्य घाम गाळला तर अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व धवल कुलकर्णी यांच्यामध्ये सुधारणा दिसून आली.