आॅलिम्पिक बॉक्सिंगमध्ये फिक्सिंगची शक्यता
By Admin | Updated: August 3, 2016 04:20 IST2016-08-03T04:20:51+5:302016-08-03T04:20:51+5:30
ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने रिओ आॅलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये काही लढती ‘फिक्स’ होण्याची शक्यता वर्तविली आहे

आॅलिम्पिक बॉक्सिंगमध्ये फिक्सिंगची शक्यता
लंडन : रिओ आॅलिम्पिकला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने रिओ आॅलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये काही लढती ‘फिक्स’ होण्याची शक्यता वर्तविली आहे, पण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (आयबा) भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावताना पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.
ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने सूत्राचा हवाला देताना म्हटले आहे की, ‘अनेक सिनिअर रेफरी व जज यांचा एक गट प्रतिष्ठेच्या स्पर्धेपूर्वी एकत्र येतो आणि हात व डोक्याच्या संकेतावरून विजेता कसा निश्चित करायचा, हे ठरवतो.’या वृत्तपत्राने आपल्या वृत्तात पुढे म्हटले की,‘हौशी बॉक्सिंगमधील अनेक सिनिअर्सनी आॅलिम्पिक पदकांसह काही लढती फिक्स होण्याची शक्यता वर्तवली आहे. अधिकारी आपले वजन वापरून ड्रॉमध्ये फिक्सिंग करू शकतात. कुणाला विजयी करायचे, हे जज निश्चित करू शकतात.’
जोपर्यंत आम्हाला कुठले सबळ पुरावे मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारच्या आरोपांवर भाष्य करणार नाही. आम्ही स्पर्धा निष्पक्ष व पारदर्शी कशी होईल, यासाठी प्रयत्नशील आहोत, असे आयबातर्फे स्पष्ट करण्यात आले. वृत्तपत्रात आयर्लंडचे जज सीमस केली यांनी म्हटले आहे की, २०११मध्ये दोहा येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान त्यांना इशारा करीत सामना फिक्स करण्यास सांगण्यात आले होते. त्यांचे सहकारी अधिकारी भाष्य करण्यास भीत होते. कारण त्यांना भविष्यात मोठ्या स्पर्धेत जजची भूमिका बजावण्याची संधी मिळणार नाही, असे त्यांना वाटत होते.’एका उच्चपदस्थ सूत्राने सांगितले की, भ्रष्टाचार थेट आयबा प्रशासनाद्वारे केला जातो. प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये स्कोअरमध्ये फिक्सिंग होते. रिओ आॅलिम्पिकमध्येही असे होण्याची भीती आहे. (वृत्तसंस्था)