द्विपक्षीय मालिकेची शक्यता मावळली नाही
By Admin | Updated: October 23, 2015 01:18 IST2015-10-23T01:18:32+5:302015-10-23T01:18:32+5:30
आगामी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या प्रस्तावित भारत - पाक द्विपक्षीय मालिकेच्या आशा अजूनही पूर्णपणे मावळल्या नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय)

द्विपक्षीय मालिकेची शक्यता मावळली नाही
कराची : आगामी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या प्रस्तावित भारत - पाक द्विपक्षीय मालिकेच्या आशा अजूनही पूर्णपणे मावळल्या नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी आणि आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी मंडळाच्या निमंत्रणावरून मुंबई दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या (पीसीबी) अधिकाऱ्यांचा बीसीसीआयने योग्यप्रकारे पाहुणचार केला.
सध्याची स्थिती भारत - पाक मालिका होणार नाही अशी असताना, शुक्ला यांनी केलेल्या विधानांमुळे पुन्हा एकदा या मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेली दक्षिण आफ्रिकेविरुध्दची एकदिवसीय मालिका २५ आॅक्टोबरला समाप्त होणार असून, या मालिकेनंतर भारत-पाक मालिकेबाबत पुन्हा चर्चा होऊ शकते, असे शुक्ला यांनी सांगितल्याने आणखीन उत्सुकता वाढली आहे.
शुक्ला यांनी एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली की, अजूनही या प्रस्तावित मालिकेची शक्यता मावळली नसून, कधीही याबाबत चर्चा करू शकतो. त्याचवेळी पीसीबीचे कार्यकारी समिती प्रमुख नजम सेठी यांनी बीसीसीआयकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगितले आहे. (वृत्तसंस्था)