कराची : आशिया खंडातील देशांमध्ये खेळविण्यात येणारी आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेचे आगामी सत्र संयुक्त अरब अमिरीती (यूएई) येथे होण्याची शक्यता आहे. नुकताच मलेशिया येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) बैठकीमध्ये यावर अंतिम निर्णय जरी घेण्यात आला नसला तरी, दर दोन वर्षांनी आयोजन होत असलेल्या या स्पर्धेच्या यजमानपदासाठी यूएईला मजबूत दावेदार मानले जात आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या (पीसीबी) एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भारत व श्रीलंकासह कसोटी खेळणाऱ्या कोणत्याही राष्ट्राने या स्पर्धेच्या यजमानपदासाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळेच समितीच्या सदस्यांनी यूएईकडे अधिक लक्ष दिले असून याविषयी अंतिम विचार पुढील महिन्यात घेण्यात येईल.भारताने गेल्यावर्षी आयपीएलचे काही सामने यूएईमध्ये खेळवले असल्याने त्यांच्याकडून यूएईच्या यजमानपदासाठी कोणताही आक्षेप नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान एसीसी बाबत अधिक सांगताना सूत्रांनी सांगितले की, सध्या एसीसी संस्था म्हणून अस्तित्वात नसून एसीसीचे क्वालालांपूर येथील कार्यलय बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर यापुढे एसीसी अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नियंत्रण असेल असा निर्णयही एसीसी बोर्ड मिटींगमध्ये घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती मिळाली असून, आशियाई क्रिकेट विषयी आयसीसी सोबत समन्वय करण्यासाठी पाकिस्तानचे सुलतान राणा आणि एक वित्त अधिकारी यांचे सिंगापूर येथे वास्तव असेल. शिवाय एसीसीच्या बैठकीनंतर १८ सदस्यीय मंडळातील बहुसंख्य सदस्यांची कपात केली असून, यापुढे एसीसीचे विकास अधिकारी आयसीसीच्या निर्देशनाखाली काम करतील व २०१६ सालापासून थेट आयसीसीला अहवाल देतील. (वृत्तसंस्था)
आशियाई चषक क्रिकेट यूएईमध्ये होण्याची शक्यता
By admin | Updated: June 15, 2015 01:05 IST