फिफा मुख्यालयातील संगणक डाटा पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: June 12, 2015 03:44 IST2015-06-12T03:44:13+5:302015-06-12T03:44:13+5:30
२०१८ आणि २०२२ च्या फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद सोपविताना झालेल्या मतदानाची चौकशी करणाऱ्या स्वित्झर्लंड पोलिसांनी फिफा

फिफा मुख्यालयातील संगणक डाटा पोलिसांच्या ताब्यात
लुसाने : २०१८ आणि २०२२ च्या फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद सोपविताना झालेल्या मतदानाची चौकशी करणाऱ्या स्वित्झर्लंड पोलिसांनी फिफा मुख्यालयातील संगणक डाटा गुरुवारी ताब्यात घेतला. फिफाने कालच २०२६ च्या यजमानपदाची बोली स्थगित केली होती. दरम्यान, फिफा अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे झिको हे पहिले उमेदवार ठरले.
स्वीस पोलीस २०१० च्या त्या मतदान प्रक्रियेचा तपास करीत आहेत, ज्या अंतर्गत २०१८ चे यजमानपद रशियाला आणि २०२२ चे यजमानपद कतारला सोपविण्यात आले होते. फिफा प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, फिफाने सर्व डाटा अॅटर्नी जनरलच्या स्वाधीन केला आहे. दुसरीकडे बीबीसीने असा दावा केला की सॅप ब्लाटर, महासचिव जेरो वाल्के, मुख्य वित्त अधिकारी मार्क्स केटनेर यांच्या केबिनमधून अनेक दस्तावेज ताब्यात घेण्यात आले. सविस्तर माहिती देण्यास प्रवक्त्याने नकार दिला.
वाल्के म्हणाले, ‘रशियाने प्रामाणिकपणे २०१८ च्या विश्वचषकाचे यजमानपद मिळविले आहे. यजमानपदाचे अधिकार खरेदी करण्यात आले, असे कुणाला वाटत असेल तर ती शिफारस होती.’ रशियाचे क्रीडामंत्री विटाली मुल्को म्हणाले, ‘सध्या मी स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असल्याने फिफामध्ये सुरू असलेल्या घडामोडींकडे माझे लक्ष नाही.’(वृत्तसंस्था)