डेहराडून : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याहस्ते ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे मंगळवारी शानदार समारंभात उद्घाटन पार पडले. राज्याची स्थापना होऊन २५ वर्षे झालेल्या उत्तराखंडच्या सांस्कृतिक परंपरेची झलक आणि विविध कार्यक्रमांची मेजवानी यावेळी सादर करण्यात आली.देशभरातील ३२ राज्यांतील दहा हजार खेळाडूंनी दिमाखदार पथसंचलन केले. दि. १४ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन राजधानी डेहराडूनसह सात पर्वतीय शहरांमध्ये होत आहे. ४५० सुवर्णांसाठी खेळाडू चढाओढ करतील. कडाक्याची थंडी असताना राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये गर्दी उसळली होती.
मोदी यांनी २०२२ (गुजरात) आणि २०२३ (गोवा) येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन केले होते. उत्तराखंडचा राज्य पक्षी 'मोनाल 'कडून प्रेरणा 'मौली'ला स्पर्धेचे शुभचिन्ह बनविण्यात आले आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा, बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू नेमबाज मनू भाकर या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत अन्य खेळाडूंना स्पर्धेत चमक दाखविण्याची मोठी संधी आहे. प्रमुख खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक पदक विजेते नेमबाज स्वप्निल कुसाळे आणि सरवज्योतसिंग, विश्व चॅम्पियनचा बॅडमिंटन पदक विजेता लक्ष्य सेन, टोकियो ऑलिम्पिकची कांस्य विजेती बॉक्सर लवलिना बोरगोहेन आर्दीचा समावेश आहे.
महाराष्ट्राचे पथक लक्षवेधी
महाराष्ट्राच्या २० खेळाडू, संघटकांनी राजेशाही फेटा परिधान करीत लक्षवेधी संचलन केले. जागतिक पदक विजेती महिला तिरंदाज अदिती स्वामी व जगज्जेत्या भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज फडकविला.
खो-खो संघ विजयी
गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खो-खो संघांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विजयारंभ केला.महिला संघाने यजमान उत्तराखंडचा ३७-१४ असा २३ गुण व १ डाव राखून धुव्वा उडविला, तर पुरुष संघानेही उत्तराखंडला ३७-२२ असे १५ गुण व एक डावाने हरविले. प्रियांका इंगळे, अश्विनी शिंदे व सानिका चाफे (२.२० मिनिटे) यांनी विजयात योगदान दिले. पुरुष गटात रामजी कश्यप आणि अनिकेत चेंदवणकर यांनी चमक दाखविली.
जेव्हा एखादा देश खेळांमध्ये विकास करतो त्यावेळी जगभर त्याची कीर्ती होत असते. या स्पर्धेत अनेक विक्रम तुटतील, नवे प्रस्थापित होतील. 'एक भारत श्रेष्ठ भारत' साठी ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तम व्यासपीठ ठरेल.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान